पाकिस्तान सुपर लीग टी २० स्पर्धेत मुलतान सुलतान्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यात झालेल्या सामन्यात लाहोर कलंदर्सने विजय मिळवला. खुशदिल शाहच्या नाबाद ७० धावांच्या खेळीच्या जोरावर मुलतान सुलतान्स संघाने २० षटकात लाहोर कलंदर्स संघाला १८७ धावांचे आव्हान दिले. ख्रिस लीनच्या झंजावाती शतकाच्या बळावर लाहोर संघाने हे आव्हान अवघ्या १८.५ षटकात १ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. या दमदार खेळीमुळे लाहोर कलंदर्स संघाला स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले.

लाहोर संघाला विजयासाठी १८७ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवातीला फखर झमानने तुफान फटकेबाजीला सुरूवात केली. त्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार लगावत ५३ धावा केल्या. पण फिरकीपटूला पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्टीचीत झाला. त्यानंतर ख्रिस लीनने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली आणि सामना एकहाती लाहोरच्या संघाकडे झुकवला. १२ चौकार आणि ८ षटकार खेचत त्याने ५५ चेंडूत तब्बल नाबाद ११३ धावा कुटल्या. ७ चेंडू आणि ९ गडी राखून त्याने लाहोरच्या संघाला सामना जिंकवून दिला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुलतान सुल्तान्स संघाची सुरूवात खराब झाली. दोनही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतल्यावर शान मसूद आणि रवि बोपारा जोडीने त्यांच्या डावाला स्थैर्य दिले. त्यांनी योग्य वेळी फटकेबाजी करत डाव पुढे नेला. पण खेळपट्टीवर स्थिरावत असतानाच हे दोघेदेखील एका पाठोपाठ बाद झाले. त्यानंतर खुशदिल शाहने दमदार फटकेबाजीला सुरूवात केली. त्याने ५ चौकार आणि ६ षटकार लगावत शेवटपर्यंत खिंड लढवली आणि नाबाद ७० धावा केल्या. पण लाहोरच्या फलंदाजीपुढे हे आव्हान तोकडे पडले.

Story img Loader