यजमान आफ्रिकेने पोर्ट एलिजाबेथच्या मैदानावर दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत आफ्रिकेने १२ धावांनी बाजी मारली. या सामन्यात दोनही संघातील खेळाडूंनी दमदार फिल्डिंगचा दाखला दिला. या सामन्यात आफ्रिकेच्या फाफ डु-प्लेसिस आणि डेव्हिड मिलर यांनी सीमारेषेवर एक भन्नाट झेल पकडत वाहवा मिळवली. त्याचसोबत आफ्रिकेच्या फलंदाजीच्या वेळी स्टीव्ह स्मिथनेदेखील तुफान ‘हवाई फिल्डिंग’ केली.

पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ४ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या. कर्णधार क्विंटन डी-कॉकने सामन्यात ४७ चेंडूत ७० धावा ठोकल्या. मात्र तो फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथने तब्बल ५ धावा आडवल्या. क्विंटन डी कॉकने लेग साईडला हवेत फटका मारला. चेंडू षटकार जाणार असं वाटत असतानाच स्टीव्ह स्मिथने अत्यंत चपळाईने हवेत झेप घेत चेंडू अडवला आणि हवेतच चेंड़ू सीमारेषेच्या आत ढकलला. त्याच्या या प्रयत्नाची तुफान स्तुती करण्यात येत आहे.

पाहा हा अफलातून व्हिडीओ –

दरम्यान, १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानेही प्रत्युत्तरादाखल आश्वासक सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावत कांगारुंचे आव्हान कायम राखले होते. एका क्षणाला ऑस्ट्रेलियाला २४ चेंडूत विजयासाठी ३२ धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे ७ विकेट शिल्लक होत्या. पण अखेरच्या षटकांत कांगारुंवर दबाव टाकण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले. कगिसो रबाडाने १९ व्या षटकात केवळ ३ धावा देत कांगारुंवर दडपण वाढवलं. अंतिम षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७ धावांची गरज होती. मात्र नॉर्ट्जेने टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चाखण्यास भाग पाडले.