WPL 2023 Final MI vs DC Updates: महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन हंगाम आज संपला आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात गडी राखून पराभव केला. हरनप्रीत कौरच्या संघाने पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावत आश्चर्यकारक कामगिरी केली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने २० षटकांत नऊ गडी गमावून १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा करून सामना जिंकला.

या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघाने एकच जल्लोष केला. यामध्ये चाहत्यासह फ्रेंचायझीच्या मालकीन नीता अंबानी यांनी देखील जल्लोष केला. त्याचबरोबर तंबूत बसलेल्या महिला खेळाडू मैदानावर धावत गेल्या आणि आपल्या दोन्ही फलंदाजांची गळाभेट घेतली. ज्याचा व्हिडिओ महिला प्रीमियर लीगच्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे.

इंग्लंडची अनुभवी खेळाडू नताली सीव्हर ब्रंटने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले आहे. तिने ५५ चेंडूत नाबाद ६० धावा करत सांघिक विजेतेपद पटकावले. मुंबई फ्रँचायझीच्या खात्यातील ही सहावी ट्रॉफी आहे. मुंबई फ्रँचायझीच्या पुरुष संघ आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन बनला आहे.

नतालीने अमेलिया केरसोबत चौथ्या विकेटसाठी २० चेंडूत नाबाद ३९ धावांची भागीदारी केली. अमेलिया केर आठ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिली. नतालीने याआधी कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७४ चेंडूत ७२ धावांची भागीदारी केली होती. हरमनप्रीत ३९ चेंडूत ३७ धावा करून बाद झाली. हिली मॅथ्यूजने १३ आणि यास्तिका भाटियाने चार धावा केल्या. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोलायचे झाले तर एके काळी त्याच्या नऊ विकेट ७९ धावांत पडल्या होत्या. संघाला १०० धावांचा टप्पाही गाठता येणार नाही, असे वाटत होते. परंतु तिथून शिखा पांडे आणि राधा यादवने डाव सांभाळला. दोघींनी शेवटच्या विकेटसाठी २४ चेंडूत नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. राधाने १२ चेंडूत नाबाद २७ तर शिखाने १७ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. राधाने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी शिखाच्या बॅटमधून तीन चौकार आणि एक षटकारही मारला.

हेही वाचा – SA vs WI 2nd T20: जॉन्सन चार्ल्सने ३९ चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, अनेक विक्रम मोडताना गेललाही टाकले मागे

दिल्लीच्या दिग्गज फलंदाजांनी या सामन्यात निराशा केली. कर्णधार मेग लॅनिंग वगळता कोणीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाही. लॅनिंगने २९ चेंडूत ३५ धावा केल्या. ती दुर्दैवाने धावबाद झाली. मारिजन कॅपने १८ आणि शफाली वर्माने ११ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून इस्सी वँग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. अमेलिया केरला दोन बळी मिळाले.

Story img Loader