Video: आशिया चषक २०२२ मध्ये अ गटातील सामन्यात २ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग ही महत्त्वाची लढत पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये विजयी झालेल्या भारत, श्रीलंका व अफगाणिस्तानच्या संघांनी अगोदरच अव्व्ल ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आजच्या पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्यानंतर सुपर ४ मधील शेवटची जागा या दोन्हीपैकी एका संघाला पटकवायची आहे. त्यामुळे निश्चितच आज दोन्ही संघ आपला सर्वोत्तम खेळ दाखवतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि हाँग काँगचा कर्णधार निझाकत खान यांच्या भेटीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. बाबर आझम व हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खान याची भेट खास ठरली. निझाकत हा सुद्धा मूळ पाकिस्तानचा आहे. या व्हिडीओमध्ये निझाकत बाबरकडून फलंदाजीबद्दल “टिप्स” मागताना दिसत आहे. बाबरप्रमाणेच, निझाकतही हाँगकाँगचा सलामीवीर आहे, बाबरने आशिया चषकात निझाकतच्या कामगिरीचे कौतुक केल्यावर निझाकतने आम्हाला पण फलंदाजीच्या टिप्स दे ना अशी खेळकर मागणी निझाकतने केली आहे.
पाहा व्हिडीओ
हाँगकाँगने भारताविरुद्धच्या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली होती. उपकर्णधार केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्माला सामन्यात लवकर बाद केल्याने टीम इंडियाची चिंता वाढवली होती. सूर्यकुमार यादव व विराट कोहलीच्या खेळीमुळे भारताने जरी सामना जिंकला असला तरी हाँगकाँगच्या खेळीने सर्वांचे मन जिंकले होते.
पाकिस्तान मात्र भारताच्या विरुद्ध फार दमदार कामगिरी करू शकला नव्हता. अवघ्या १४७ धावा आणि गोलंदाजीतही भरपूर चुका यामुळे पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. आजच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग लढत पाहायला मिळेल यात नेमके कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.