Virat Kohli Reveals About Novak Djokovic Message : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने २४ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचला २०२४ ऑस्ट्रेलियन ओपनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने सर्बियाच्या खेळाडूशी पहिल्यांदा कसे संभाषण झाले होते, याबाबत खुलासा केला आहे. याआधी जोकोविचने सांगितले होते की, दोन दिग्गजांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संभाषण सुरू आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील ५० व्या एकदिवसीय शतकानंतर जोकोविचने त्याला एक खास संदेश पाठवला असल्याचे कोहली म्हणाला. यामध्ये त्याने जागतिक क्रीडापटूंचा सहवास उत्कृष्ट असल्याचे नमूद केले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर जारी केलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहलीने सांगितले की, तो इन्स्टाग्रामवर नोवाक जोकोविचचे प्रोफाइल पाहत होता. त्याने संदेश पाठवण्याचा विचार केला. तसे करायला गेल्यावर जोकोविचचा संदेश आधीच तिथे असल्याचे दिसले. त्याला वाटले की हे खाते बनावट असू शकते, पण तसे नव्हते. यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. आता दोघेही एकमेकांना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा देत असतात.
विराट कोहली काय म्हणाला?
विराट कोहली म्हणाला, “मी अतिशय व्यवस्थित पद्धतीने नोव्हाकच्या संपर्कात आलो. मला वाटते की मी एकदा त्यांचे इन्स्टाग्रामवर प्रोफाइल पाहत होतो. यानंतर मी त्यांना मेसेज करण्यासाठी प्रोफाइलवर प्रेस केले आणि मी फक्त हॅलो म्हणेल. मग मी त्यांचा डीएमवर मेसेज पाहिला. मी स्वतः ते कधीच उघडले नव्हते. त्यामुळे मला वाटले की, ते खोटे खाते आहे की खरे तपासावे, परंतु नंतर मी ते दोनदा तपासले आणि ते अधिकृत होते. मग आम्ही बोलू लागलो. आम्ही वेळोवेळी संदेशांची देवाणघेवाण करत असतो. त्यांच्या सर्व अद्भुत कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”
हेही वाचा – IPL 2024 : “दोन खेळाडू एकत्र खेळतात तेव्हा…”, रोहित-हार्दिकमधील कथित वादावर युवराज सिंगची प्रतिक्रिया
जोकोविचने कोहलीचे ५० व्या वनडे शतकाबद्दल केले होते अभिनंदन –
विराट कोहली म्हणाला, “मी जेव्हा नुकतेच माझे ५० वे वनडे शतक झळकावले होते, तेव्हा मला वाटते की त्यांनी याबद्दल कदाचित एक स्टोरी शेअर केली होती. त्यांनी मला खूप छान संदेशही पाठवला होता. त्यामुळे आमच्यात परस्पर कौतुक आणि आदर निर्माण झाला आहे. उच्च स्तरावर खेळणाऱ्या जागतिक क्रीडापटूंशी जोडले गेल्याने छान वाटते. मला वाटते की यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल.”
जोकोविचच्या फिटनेसने विराट कोहली प्रभावित –
किंग कोहली म्हणाला, “मी म्हटल्याप्रमाणे, मला त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या प्रवासाबद्दल खूप आदर आहे. त्यांची फिटनेसची आवड अशी गोष्ट आहे, जी मी स्वतः फॉलो करतो आणि त्यावर खूप विश्वास ठेवतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे बरेच काही आहे. आशा आहे की ते भारतात आले किंवा मी ते खेळत असलेल्या देशात असलो, तर आम्ही नक्कीच भेटू आणि कदाचित एकत्र कॉफी देखील घेऊ.”
हेही वाचा – IND vs ENG : मुंबई इंडियन्सने पोस्टरमधून रोहित शर्माला वगळल्याने चाहते संतापले; म्हणाले…
कोहलीने जोकोविचला ऑस्ट्रेलिया ओपनसाठी दिल्या शुभेच्छा –
विराट कोहलीने २०२४ च्या ऑस्ट्रेलिया ओपनसाठी जोकोविचला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, “मी तुम्हाला ऑस्ट्रेलियन ओपनसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. या मोठ्या स्पर्धांसाठी तुम्ही किती उत्सुक आणि तयार आहात हे मला माहीत आहे. आपण वर्षानुवर्षे पाहिलेला नोव्हाक जोकोविच आपल्याला पाहायला मिळेल यात मला शंका नाही. मला आशा आहे की, ही स्पर्धा तुमच्यासाठी शानदार असेल.”