Gautam Gambhir and Yuvraj Singh on T20 World Cup 2024 : आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ जिंकण्याच्या शर्यतीतून टीम इंडियाला बाहेर केले आहे. ही स्पर्धा यूएसए आणि वेस्ट इंडीज येथे आयोजित केली जाणार आहे. तत्त्पूर्वी भारताचे माजी विश्वचषक विजेते गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांनी आपल्या वक्तव्याने सर्वांना चकित केले आहे. या दोघांनी भारताव्यतिरिक्त इतर दुसऱ्या संघाना टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजयाचे प्रबळ दावेदार म्हटले आहे.
गंभीर आणि युवराज सिंग यांनी इन्स्टाग्रामवर सॉफ्ट ड्रिंक ब्रँड “थम्सअप” ने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचे मत व्यक्त केले आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने पुढील वर्षी होणारा टी-२० विश्वचषक २०२४ जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला प्रबळ दावेदार म्हटले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानलाही या प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचंही त्यानी म्हटलं आहे, पण त्याच्या मते भारत ट्रॉफी जिंकण्याची शक्यता नाही. दुसरीकडे, गौतम गंभीरने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या आवडत्या संघाचा उल्लेख केला नाही, परंतु तो म्हणाला की, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मेगा स्पर्धेत भारतासाठी धोकादायक ठरू शकतात.
दरम्यान, गौतम गंभीरचा असा विश्वास आहे की अफगाणिस्तान सर्व संघांना धक्का देऊ शकतो आणि भारताला पराभूत देखील करू शकतो. विशेषत: ज्या परिस्थितीत २०२४ टी-२० विश्वचषक खेळला जाईल. आयसीसी स्पर्धांमधला सर्वात यशस्वी संघ असलेला ऑस्ट्रेलिया भारतासमोर कडवे आव्हान उभे करेल, असा विश्वासही त्यानी व्यक्त केला आहे. गौतम गंभीर म्हणाला, “टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वात मोठा धोका अफगाणिस्तान असू शकतो. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान खूप धोकादायक ठरू शकतो. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, कारण त्यांच्याकडे प्रभावी खेळाडू आहेत आणि इंग्लंड, कारण ते टी-२० क्रिकेटमध्ये जसे खेळणे आवश्यक आहे, तसे ते खेळतात.”
हेही वाचा – BAN vs NZ 1st T20 : बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! न्यूझीलंडला त्यांच्याच देशात टी-२० मध्ये प्रथमच केले पराभूत
दरम्यान, युवराज सिंग म्हणाला, “मला वाटते की दक्षिण आफ्रिका टी-२० विश्वचषक जिंकेल. त्यांनी अद्याप मर्यादित षटकांची स्पर्धा जिंकलेली नाही. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्यांची कामगिरी शानदार राहीली होती. त्यावरुन मला ते खूप मजबूत संघ दिसत आहेत. मग अर्थातच पाकिस्तान आहे, जो खूप धोकादायक संघ आहे.”