भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. फाफ डुप्लेसिस पूर्णपणे तंदुरुस्त नसताना तो आरसीबीचे कर्णधारपदही सांभाळत आहे. मात्र, या सर्व गोष्टींमध्ये तो आपल्या कुटुंबासाठीही वेळ काढताना दिसत आहे. नुकताच तो पत्नी अनुष्का शर्मासोबत एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसला. या स्पर्धेत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बॅडमिंटन खेळले. दोघेही मिश्र संघ म्हणून खेळत होते. तर विरुद्ध संघातील खेळाडू कोहली आणि अनुष्का ‘या’ दोन तरुणांचा सामना करत होते. दोघांच्याही चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला असून चाहते सोशल मिडीयावर खूप लाईक आणि शेअर करत आहेत.
विराट-अनुष्काचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
या व्हिडीओवर, प्यूमा इंडियाचे दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गांगुली म्हणाले की, “खेळ आणि फिटनेस हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. हे आपल्याला चांगले सक्षम बनण्यास मदत करते.” ते म्हणाले की, “PUMA एक ब्रँड म्हणून कौशल्य आणि फिटनेस सुधारण्यासाठी नेहमीच काम करत आले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आज आमच्या कार्यक्रमात आले होते, दोघेही युथ आयकॉन आहेत. या दोघांच्या चाहत्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. तसेच, या कार्यक्रमामुळे चांगली जनजागृती होण्यास मदत होईल,” असेही ते पुढे म्हणाले.
कोहली आणि अनुष्काने यापूर्वी एकत्र काम केले आहे
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी यापूर्वी अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आहे. २०१३ मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले होते. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०१७ मध्ये लग्नानंतर दोघेही एका मुलीचे आई-वडील झाले आहेत, तिचे नाव वामिका आहे. विराट आणि अनुष्काने लग्नाआधी आणि नंतरही अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आहे. आता पुन्हा एकदा दोघेही जाहिरातीत एकत्र काम करताना दिसणार आहेत.
विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्ससोबतच्या संवादात अनुष्काबाबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. कोहली म्हणाला होता, “मला आठवतंय, २०१३ मध्ये माझी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून निवड झाली होती, मी खूप उत्साहित होतो. त्यानंतर माझ्या व्यवस्थापकाने एका टीव्ही जाहिरातीबद्दल फोन केला. त्याने मला सांगितले की, मी अनुष्का शर्मासोबत शूटिंग करणार आहे. ती त्या वेळी टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती, अजूनही आहे, पण बॉलीवूडची अभिनेत्री हे ऐकताच मी हादरलो. आधी मला थोडी भीती वाटली होती.”
हेही वाचा: Kohli on Anushka: सेल्फीसाठी एक चाहता अनुष्काजवळ आला अन् विराट कोहली भडकला, Video व्हायरल
पुढे हा किस्सा सांगताना कोहली म्हणाला की, “सेटवर जाण्याआधी मी खूप तणावात होतो. मी विचार करत होतो, मी कसा दिसतो? ती किती सुंदर आहे. भेटल्यावर आधी तिला नमस्कार करू, हाय-हलो करू की आणखी काय बोलू? या सर्व प्रश्नांनी मला भंडावून सोडले होते. मी तिच्याआधी पाच मिनिटे तिथे पोहचलो होतो. मला माहीत नव्हते की, ती किती उंच आहे. तिने उंच टाचेचे हाय-हिल्स सँडल घातले होते. जेव्हा मी तिचे सँडल हातात घेऊन पहिले तेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले आणि विचारले, ‘तुला हे घालताना भीती नाही वाटत का पडायची?’ त्यावर ती खूप मोठमोठ्याने हसू लागली.”