भारताविरुद्धच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये दाणादाण उडाली असून त्यांच्यापुढे चौथा आणि अखेरचा सामना वाचवण्याचे ध्येय असेल. संघाच्या मनोबलाचे कमालीचे खच्चीकरण झालेले असले तरी त्यांच्यासाठी एक सुखावह बाब म्हणजे हकालपट्टी करण्यात आलेला संघाचा उपकर्णधार शेन वॉटसन चौथ्या कसोटी सामन्यासाठी सोमवारी सिडनीहून भारतात येण्यासाठी रवाना होत आहे.
सोमवारी वॉटसन सिडनीहून निघाला असून रात्री तो नवी दिल्लीमध्ये दाखल होईल. पण संघात मात्र तो मंगळवारी दाखल होणार आहे. भारताविरुद्धचा चौथा कसोटी सामना २२ मार्चपासून नवी दिल्ली येथील फिरोझशाह कोटला स्टेडियमवर होणार आहे. वॉटसनसह उस्मान ख्वाजा, जेम्स पॅटिन्सन आणि मिचेल जॉन्सन यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी चार खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करत संघातून एका सामन्यासाठी हकालपट्टी केली होती. यापैकी अन्य तीन खेळाडू संघाबरोबर असले तरी पत्नी गरोदर असल्यामुळे वॉटसन मायदेशी रवाना झाला होता. वॉटसनला गेल्या आठवडय़ात पुत्ररत्न झाले असून तो चौथ्या सामन्यासाठी संघात दाखल होण्यासाठी रवाना झाला आहे.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी वॉटसन भारतात परतणार आहे. सिडनीहून निघून तो संघात दाखल होईल, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने पत्रकाद्वारे दिली आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर वॉटसन चौथी कसोटी वगळून मायदेशी परतणार होता. पण हकालपट्टीचा बडगा उगारल्यावर वॉटसनने थेट मायदेशी जाणे पसंत केले. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अंतिम कसोटीसाठी वॉटसन संघात असायला हवा, असे कर्णधार मायकेल क्लार्कने बोलून दाखवले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पाठीच्या दुखण्याने क्लार्क बेजार झाला असून चौथ्या कसोटी सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. क्लार्कने चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती घेतल्यास खबरदारीचा उपाय म्हणून वॉटसनला चौथ्या कसोटी सामन्यासाठी बोलावण्यात आले असावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा