गोल करण्याच्या अफलातून क्षमतेमुळे वेन रुनीला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी चेल्सीने जोरदार प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश मिळाले नाही. या अधुऱ्या राहिलेल्या प्रयत्नांचा बदला घेण्याची संधी चेल्सीला रुनीच्या मँचेस्टर युनायटेडविरुद्धच्या सामन्यात होती. मात्र घडले भलतेच. रंजक मुकाबला पाहण्याच्या उद्देशाने मोठय़ा संख्येने गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांना गोलशून्य बरोबरीच्या निर्णयावर समाधान मानावे लागले. मँचेस्टर युनायटेडसाठी गोल करण्याकरिता रुनीने अविरत प्रयत्न केले.
चेल्सीच्या मजबूत बचावाला भेदण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला. रुनीचा आक्रमक खेळ हीच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली. मात्र रुनी मँचेस्टर युनायटेडला गोल करून देऊ शकला नाही. युनायटेडचे नवे व्यवस्थापक डेव्हिड मोयस यांच्यासाठी घरच्या मैदानावरचा हा पहिलाच मुकाबला होता. मात्र प्रचंड पाठिंबा असतानाही संघ विजयी झालेले पाहण्याचे त्यांचे स्वप्न लांबणीवर पडले. जोस मॉरिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या चेल्सीने मँचेस्टर युनायटेडचे आक्रमण सहजेतेने थोपवले, मात्र गोल करण्याची किमया त्यांनाही साधता आली नाही. गोलशून्य बरोबरीच्या निर्णयामुळे चेल्सीने तात्पुरते गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे, मात्र त्यांनी अन्य संघांपेक्षा एक सामना अधिक खेळला आहे आणि मँचेस्टर युनायटेडने लिव्हरपूलवर विजय मिळवल्यास ते अव्वल स्थानी कब्जा करू शकतात.
एप्रिलनंतर पहिल्यांदाच युनायटेडने रुनीला संघात समाविष्ट केल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाला उधाण आले होते. चेल्सीनेही संघात काही महत्त्वपूर्ण बदल केले. मँचेस्टर युनायटेडसारखा दमदार प्रतिस्पर्धी संघ असूनही चेल्सीने अननुभवी आघाडीपटूंना संघात स्थान दिले. यामध्ये आंद्रे शुअर्ले, इडन हाझार्ड आणि केव्हिन डि ब्रून यांचा समावेश होता. या निर्णयाचा चेल्सीला फटका बसला, कारण हे त्रिकूट गोल करण्यात अपयशी ठरले.

Story img Loader