Salman Agha Bad Fielding : पाकिस्तानी क्रिकेट संघ नेहमी त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या क्षेत्ररक्षणामुळे ट्रोल होत असतो. समाजमाध्यमांपासून ते समालोचकांपर्यंत सगळ्यांसाठीच पाकिस्तानी खेळाडूंचं क्षेत्ररक्षण हा थट्टेचा विषय बनला आहे. सगळीकडून टीका होत असली तरी विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतही पाकिस्तानी खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावलेला नाही. आज (२७ ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूने अडवलेल्या चेंडूने यष्ट्यांच्या (स्टम्प) वेध घेण्याऐवजी त्यांच्याच गोलंदाजाचा वेध घेतला.
चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४६.४ षटकांत १० गड्यांच्या बदल्यात २७० धावांचा डोंगर उभा केला आहे. २७१ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत ३० षटकांत ४ गड्यांच्या बदल्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली आहे.
दरम्यान, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना पाचव्या षटकात गोलंदाज मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने मिड ऑनच्या दिशेने फटका लगावला आणि चोरटी धाव घेण्यासाठी तो धावू लागला. सलमान अली आगा मिड ऑनला क्षेत्ररक्षण करत होता. तो चेंडू पकडण्यासाठी पुढे सरसावला. त्याचवेळी पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान सलमान आगाकडे पाहून ‘मार दे, मार दे’ (यष्ट्या टिपून बवुमाला धावबाद कर) असा ओरडत होता. सलमानने चेंडू अडवला आणि यष्ट्यांपासून तीन ते चार मीटर दूर उभा असलेल्या गोलंदाज मोहम्मद नवाजच्या दिशेने भिरकावला. हा चेंडू मोहम्मद नवाजच्या हातावर आदळला. नवाज हात झाडत तिथून बाजूला झाला. तर सलमान आगा मान खाली घालून मागे फिरला.
हे ही वाचा >> Pak vs SA: मार्को यान्सनची शेरेबाजी; रिझवानने खुणावली ‘जादू की झप्पी’
यावेळी स्टेडियममधील प्रेक्षक, दक्षिण आफ्रिकेचे समर्थक सलमान आगावर हसत होते. तर पाकिस्तानी खेळाडू आणि समर्थक सलमानवर ओरडू लागले. पाकिस्तानी समर्थकांनी मोठा दंगा सुरू केला. याचवेळी समालोचकही पाकिस्तानच्या निकृष्ट दर्जाच्या क्षेत्ररक्षणावर हसत होते. समालोचक म्हणाले, रिझवान सलमानला ‘मार दे, मार दे’ म्हणून ओरडत होता आणि सलमानने चुकीच्या माणसाला मारलं.