World Cup Final 2023 : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा आजच्या अंतिम सामन्यानंतर खूप भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. विराट कोहलीने आजच्या सामन्यात ६३ चेंडूंमध्ये चार चौकारांसह ५४ धावांची खेळी केली. मात्र २९ व्या षटकात तो पॅट कमिन्सच्या चेंडूवर तो क्लिन बोल्ड झाला. त्यानंतर मैदानात एकच शांतता पसरली होती. या सामन्यात भारताला २४० धावांपर्यंतच मजल मारता आली. कारण ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला सुरुवातीपासूनच आटोक्यात ठेवत क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केली. सलग १० सामने जिंकलेला भारत विश्वचषकावरही आपलं नाव कोरेल असं वाटलं होतं. मात्र तसं घडलं नाही, अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियन संघाने सहा विकेट्सनी हरवलं. त्यानंतर विराट जेव्हा परतला तेव्हाचा त्याचा फोटो व्हायरल होतो आहे. (Latest Marathi news)
विराट बाद झाल्यानंतर एकटा के.एल. राहुलच होता ज्याने ६६ धावांची खेळी केली. इतर सहा फलंदाजांना त्यांची धावसंख्या दोन अंकीही करता आली नाही. भारताचे सर्व गडी बाद झाले आणि २४० धावा झाल्या. मात्र हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघाने अगदी सहज पार केलं आणि जगज्जेते पदावर आपलं नाव कोरलं.
काय दिसतं आहे फोटोत?
सामन्यातल्या पराभवानंतर जेव्हा सगळे खेळाडू परतले तेव्हा रोहीत शर्मा, केएल राहुल, सिराज यांना अश्रू अनावर झाले. विराटही त्यांच्यात होता तो खूपच भावूक झाला होता. त्याच्यासाठी पत्नी अनुष्काला भेटणं आवश्यक होतं. तो अनुष्काजवळ गेला आणि त्याने अनुष्काला घट्ट मिठी मारली. अनुष्कानेही या पराभवानंतर त्याला आधार दिला. जणू काही तुझं काही चुकलं नाहीये रे.. असंच ती त्याला सांगत असावी. विराट पाठमोरा आहे आणि अनुष्का त्याला मिठीत घेऊन समजावते आहे हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आज विराट कोहलीला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा पुरस्कार घेतानाही त्याच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट जाणवत होती. रवी शास्त्री यांनी विराटचं नाव पुकारलं आणि त्याला पुरस्कार घेण्यासाठी बोलवलं. त्याने पुरस्कार घेतला. सगळ्यांशी हस्तांदोलन केलं आणि तिथून तो गेला. त्याचा हा व्हिडीओही व्हायरल होतो आहे.
एकदिवसीय विश्वचषकात ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा’ पुरस्कार जिंकणारा कोहली हा भारताचा तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी २००३ मध्ये सचिन तेंडुलकर आणि २०११ मध्ये युवराज सिंगने हा पुरस्कार जिंकला होता. यापैकी सचिन तेंडुलकर हा फायनलमध्ये पराभूत झालेल्या टीम इंडियाचा सदस्य होता, तर युवराज सिंग विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.