IND vs ENG Suryakumar Yadav told the reason for the defeat : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते, मात्र तिसऱ्या सामन्यात यजमानांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. एकेकाळी भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण ते शक्य झाले नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याचा टर्निंग पॉइंट काय होता हे सांगितले आहे. कर्णधार सूर्याने अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांच्या विकेट्सचे वर्णन टर्निंग पॉइंट म्हणून केले आणि सांगितले की जोपर्यंत हे दोन फलंदाज क्रीजवर होते, तोपर्यंत आम्ही सामन्यात होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यकुमार यादवने सांगितले पराभवाचे कारण –

सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात सूर्यकुमार यादव म्हणाला, “मला वाटले की नंतर थोडे दव पडेल. मला वाटतं जेव्हा हार्दिक आणि अक्षर फलंदाजी करत होते, तेव्हा सामना आमच्या हातात होता. याचे श्रेय आदिल रशीदला जाते, त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्यांनी आम्हाला स्ट्राईक रोटेट करु दिली नाही. त्यामुळेच आमच्या संघात अनेक फिरकीपटू होते.” भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंचा समावेश होता.

सूर्याने वरुण चक्रवर्तीचे केले कौतुक –

तो पुढे वरुण चक्रवर्तीचे कौतुक करताना म्हणाला, “आम्ही नेहमी टी-२० सामन्यातून काहीतरी शिकतो. फलंदाजीच्या दृष्टिकोनातून आम्हाला शिकायचे आहे. आम्हाला ड्रॉईंग बोर्डवर परत जावे लागेल आणि आमच्या चुकांमधून शिकावे लागेल. मला खात्री आहे की शमी नक्की चांगली कामगिरी करेल. सराव सत्रांमध्ये वरूण चक्रवर्ती खूप चांगली कामगिरी करतो आणि मेहनतीमुळे त्याला मैदानावर हे परिणाम मिळत आहेत.” तीन सामन्यांनंतर ही टी-२० मालिका आता २-१ अशी आहे. दोन सामने बाकी आहेत. चौथा सामना ३१ जानेवारीला पुण्यात तर मालिकेतील अंतिम सामना २ फेब्रुवारीला होणार आहे.

या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १७१ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये बेन डकेटने सर्वाधिक ५१ धावा केल्या तर लियाम लिव्हिंगस्टनने ४३ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने ५ तर हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या. भारतीय संघ१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९ बाद १४५ धावाच करु शकला. ज्यामुळे भारताला २६ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतासाठी हार्दिक पंड्याने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले. इंग्लंडसाठी जेमी ओव्हर्टनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We always learn from a t20i game says suryakumar yadav after defeat against england in 3rd t20i vbm