महाराष्ट्राचा नवोदित फलंदाज विजय झोलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने आशिया चषकात अजिंक्यपद भूषविल्यानंतर आगामी विश्वचषकासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास विजय झोलने व्यक्त केला आहे.
विजय म्हणाला की, “गेल्या चार मालिकांमध्ये संघाची कामगिरी उल्लेखनीय राहीली आहे. संघात कोणी एक हीरो ठरत नाही आहे. सर्वच बरोबरीची कामगिरी करत आहेत. ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. उत्तम सांघिक कामगिरीमुळे संघ विजयी मालिका कायम राखू शकतो. त्यामुळे विश्वचषकातही संघ सर्वोत्कृष्ट देण्याच्या प्रयत्नात असेल.”
येत्या १४ फेब्रुवारीपासून १९ वर्षाखालील विश्वचषकाला सुरूवात होत आहे. आशिया चषकात विजय झोलच्या नेतृत्वात केलेली विजयी कामगिरी आणि संघातील खेळाडूंचे कामगिरीतील सातत्य ही भारतीय संघाची बळकट बाजू आहे. त्यामुळे या विश्वचषक मालिकेत भारतीय संघ विजेतेपदाचा तगडा दावेदार आहे.
आशिया चषकात श्रीलंका, पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या सामन्यांचा फायदा विश्वचषकात नक्कीच दोन्ही बाजूंना होईल. परंतु, अजिंक्यपद प्राप्त केल्याने संघातील खेळाडू आत्मविश्वासाने खेळताना दिसतील. त्यामुळे विश्वचषक सामन्यांचा तितकासा दबाव वाटणार नाही असेही झोल म्हणाला. 

Story img Loader