‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरुन अष्टपैलू हार्दिक पांड्यावर सध्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन-डे मालिकेला सुरुवात होते आहे. याआधीच विराटने हार्दिक पांड्याचं संघात असणं गरजेचं असल्याचं म्हणत अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. पहिल्या वन-डे सामन्याआधी विराट पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – विराट कोहली ठरला ‘हॅटट्रीक हिरो’, पटकावले ICC चे मानाचे पुरस्कार

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारताने खलिल अहमद, मोहम्मद सिराज आणि विजय शंकर यांना संघात संधी दिली. मात्र त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पत्रकार परिषदेदरम्यान विराटला, संघासाठी गोलंदाजांचा आदर्श ताफा कसा असेल हा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना विराट म्हणाला, “संघातल्या अष्टपैलू खेळाडूवर हे अवलंबून आहे. तुम्ही इतर तुल्यबळ संघाचं उहारण पाहिलंत तर त्यांच्याकडे किमान 2 अष्टपैलू गोलंदाज असतात. त्यामुळे तुमच्या प्रमुख गोलंदाजांना विश्रांती मिळते. हार्दिक पांड्या किंवा विजय शंकर संघात खेळणार नसेल तर 3 जलदगती गोलंदाजांना खेळवणं योग्य वाटतं. पण संघात एखादा अष्टपैलू खेळाडू आला तर तुम्हाला तिसऱ्या गोलंदाजाची गरज भासणार नाही.” विराटने अप्रत्यक्षपणे हार्दिकच्या पुनरागमनासाठी मागणी केली.

अवश्य वाचा – हार्दिक पांड्या-लोकेश राहुलच्या वक्तव्यांवर राहुल द्रविड म्हणतो….

ज्यावेळी हार्दिक पांड्या संघात नसतो, त्यावेळी आम्हाला 3 जलदगती गोलंदाज घेऊन खेळावं लागलं आहे. त्यामुळे जोपर्यंत फिरकी गोलंदाजांना मदत न करणारी खेळपट्टी असेल तोपर्यंत तुम्हाला तिसऱ्या गोलंदाजाची गरज भासत नाही. मे महिन्यात सुरु होणारा विश्वचषक लक्षात घेता विराट कोहलीचं हे वक्तव्य बरचं महत्वाचं मानलं जात आहे. अद्यापही हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या चौकशीचा निकाल प्रलंबित आहे. निकाल येईपर्यंत दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयने कोणत्याही सामन्यात खेळण्याची बंदी केली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – महेंद्रसिंह धोनी भारतीय फलंदाजीची मुख्य समस्या – डीन जोन्स

Story img Loader