दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघाला १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं. २ ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत निवड समितीने रोहित शर्मा सलामीला येण्याची संधी दिली आहे. मात्र मी रोहितला २०१५ सालीच सलामीला येण्याचा सल्ला दिला होता, असं प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. ते ‘हिंदुस्थान टाईम्स’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अवश्य वाचा – विराटवरचा भार कमी करण्यासाठी रोहितला टी-२० चं कर्णधारपद देता येईल !

“२०१५-१६ च्या हंगामात मी रोहितला मुंबईकडून सलामीला येण्याचा सल्ला दिला होता. तो गुणवान खेळाडू आहे, असं मला नेहमी वाटत आलं आहे. मात्र कसोटीमध्ये पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर येऊन सर्वोत्तम कामगिरी करणं जमत नाही. मात्र ही एक मानसिक स्थिती असते, रोहितने यावर मात केली तर तो नक्की यशस्वी होईल. आम्ही त्याच्यावर सध्या कोणताही दबाव टाकणार नाहीयोत, त्याला योग्य संधी दिली जाईल.” रवी शास्त्रींनी आपली बाजू मांडली.

मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला येणाऱ्या रोहित शर्माला काही कसोटी सामन्यांमध्ये संधी मिळाली होती. मात्र त्याला मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे रोहित कसोटी क्रिकेटमध्ये फार यशस्वी ठरला नव्हता. गेल्या काही मालिकांमध्ये सलामीवीर लोकेश राहुल अपयशी ठरत असल्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी रोहितला कसोटीत संधी देण्याची मागणी केली होती. अखेरीस कसोटी मालिकेत निवड समितीने राहुलला डच्चू देत रोहितला संधी दिली आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत रोहित कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी सुरेश रैनाही शर्यतीमध्ये

Story img Loader