भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या सेवेतील समालोचकांना सेन्सॉर करते, हा आरोप अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी फेटाळून लावला. बीसीसीआय प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यामध्ये लुडबूड करीत नाही, असे त्यांनी सांगितले.
‘‘आम्ही समालोचकांना सेन्सॉर करीत नाही सेन्सॉरशिप हा चुकीचा शब्द आहे. बीसीसीआय कोणत्याही समालोचकाला तू असे म्हण, असे म्हणू नकोस अशा प्रकारे सांगत नाही,’’ असे श्रीनिवासन यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाचे माजी कप्तान इयान चॅपेल यांनी भारतातील समालोचनाचा प्रस्ताव नाकारला होता. त्यांच्या प्रस्तावामध्ये काय करावे आणि काय करू नये यांचाही समावेश असल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. चॅपेल हे बीसीसीआयच्या सेवेत नसल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.
  ‘‘बीसीसीआय प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यामध्ये कधीच हस्तक्षेप करीत नाही. परंतु अखेरीस समालोचक हा समालोचक असतो, तर पत्रकार हा पत्रकार असतो,’’ असे श्रीनिवासन यांनी सांगितले.