राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मी जोश्ना चिनप्पाच्या साथीने खेळताना सुवर्णपदक पटकावले होते. आशियाई स्पर्धेत दुहेरी प्रकारच नाही; परंतु एकेरी प्रकारात सुवर्णपदकासाठी अथक मेहनत घेत आहे, असे उद्गार भारताची अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने काढले.
जेएसडब्ल्यू चॅलेंजर स्पर्धा अनावरणाच्या प्रसंगी दीपिकाने सांगितले की, ‘‘राष्ट्रकुलच्या तुलनेत आशियाई क्रीडा स्पर्धेत आव्हान खडतर आहे, मात्र जगभरातल्या अव्वल खेळाडूंविरुद्ध आम्ही सातत्याने खेळतो. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीचा बाऊ करण्याची गरज नाही. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर अगदी लगेचच आशियाई स्पर्धा होत आहे. त्यामुळे तयारीसाठी खूपच कमी कालावधी आहे, मात्र तरीही देशासाठी पदक पटकावण्यासाठी सर्वतोपरी कसून सराव सुरू आहे.’’
ती पुढे म्हणाली, ‘‘चॅलेंजर स्पर्धा भारतात होत असल्याने युवा स्क्वॉशपटूंना उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खूप तीव्र आहे. अशा स्पर्धामध्ये सहभागी होऊन क्रमवारीचे गुण मिळवणे गरजेचे असते. विविध देशांत होणाऱ्या स्पर्धाची पात्रता फेरीही पार करणे कठीण असते. या स्पर्धासाठी जाण्यायेण्याचा तसेच सराव व प्रशिक्षणाचा खर्च सगळ्यांनाच परवडणारा नसतो. भारतात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना क्रमवारीचे गुण पटकावता येतील. जगातल्या अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर आगेकूच करण्यासाठी आपल्याला कोणत्या बाबतीत सुधारणा करणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात येऊ शकेल. मी खेळायला सुरुवात केली तेव्हा देशात अशा स्वरूपाची स्पर्धा असती तर खूप फायदेशीर ठरले असते. घरच्या मैदानावर, प्रेक्षकांच्या पाठिंब्यात खेळण्याचा आनंद अनोखा असतो. युवा खेळाडूंनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याची आवश्यकता आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा