‘रिंकूची भारतीय संघात निवड होईल अशी आम्हाला आशा होती. त्याची निवड होईल म्हणून आनंद साजरा करण्यासाठी फटाके आणले होते. रिंकूचा आईला फोन आला. तो अतिशय खिन्न मनस्थितीत होता’, अशा शब्दात रिंकू सिंगच्या वडिलांनी निराशा व्यक्त केली.
मंगळवारी आयसीसी ट्वेन्टी२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड झाली. रिंकू सिंगची १५ सदस्यीय संघात निवड झाली नाही. ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. आपात्कालीन परिस्थितीत मुख्य संघातील खेळाडूला दुखापत झाली किंवा त्याला स्पर्धेबाहेर जावं लागलं तरच ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह खेळाडूला संधी मिळू शकते. ‘भारत२४’ वृत्तवाहिनीशी बोलताना रिंकूच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रिंकूने १५ ट्वेन्टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व करताना ३५६ धावा केल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. १७६.२३ हा रिंकूचा स्ट्राईकरेट अतिशय उत्तम मानला जातो. २०२३ आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळताना रिंकूने गुजरात टायटन्सच्या यश दयाळच्या गोलंदाजीवर ५ चेंडूत ५ षटकार लगावले होते.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामातही रिंकू सातत्यपूर्ण कामगिरी करते आहे. ९ सामन्यात त्याने १२३ धावा केल्या आहेत. रिंकूला या हंगामात मोठी खेळी करण्याची संधीच अभावाने मिळाली आहे पण जेव्हा संधी मिळाली आहे त्याची बॅट तळपली आहे.
२०१८ हंगामापासून रिंकू कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करत आहे. रिंकूचे वडील गॅस वितरणाचे काम करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी रिंकू सिंगची क्रिकेटची आवड जोपासली.रिंकूनेही अनेक प्रकारची कामं करत कुटुंबाला हातभार लावला.