नवी दिल्ली : देखरेख समितीच्या अहवालात काय आहे, हे आता आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. आमच्यासाठी तो भूतकाळ आहे. आम्हाला फक्त न्यायालयाकडून न्याय हवा आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलक कुस्तिगीर विनेश फोगटने बुधवारी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुस्तिगीरांनी सर्वप्रथम धरणे आंदोलन केल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अनुभवी  बॉक्सिंगपटू  मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली देखरेख समितीची नियुक्ती केली होती. या समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात आपल्या चौकशीचा अहवाल सादर केला. मात्र, क्रीडा मंत्रालयाकडून तो अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

‘‘या समितीने काय काम केले किंवा काय अहवाल दिला, हे आता आमच्यासाठी महत्त्वाचे नाही.  झाले ते झाले. समितीचा कार्यकाळ तीन महिन्याचा होता आणि तो संपला आहे. आता लढाई न्यायालयात गेली आहे आणि आम्हाला तेथूनच न्याय हवा आहे,’’ असे विनेशने निक्षून सांगितले.

आंदोलक कुस्तिगीरांनी बुधवारी जंतरमंतरवरून बंगला साहिब गुरुद्वारापर्यंत एक मोर्चा काढला आणि तेथे प्रार्थना केली. आम्ही न्यायाची ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास व्यक्त करत विनेशने ही लढाई आता जागतिक झाली आहे. केवळ कुस्तीच नाही, तर जगातील अन्य खेळातील खेळाडूंना देखील आमच्या आंदोलनाचे महत्त्व कळून येईल,असेही विनेश म्हणाली. विनेशसह बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आमची भेट घ्यावी आणि न्याय द्यावा असे आवाहन केले.

खापपंचायतीची भूमिका महत्त्वाची

राजकीय पक्ष किंवा कुठल्या गटाचा या आंदोलनाशी संबंध नसल्याचे एकीकडे सांगत असतानाच विनेशने आमच्या पुढील नियोजनात ‘खाप’ पंचायतीची भूमिका महत्त्वाची राहील असे सांगितले. ब्रिजभूषण यांच्या अटकेसाठी आम्ही २१ मेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर ‘खाप’चे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी बंधनकारक असेल, असेही विनेशने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We expecting justice from the court says vinesh phogat zws
Show comments