भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी विराट कोहलीकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून रोहित शर्माकडे सोपवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. टी-२० विश्वचषकापूर्वी कोहलीने या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्याला वनडे आणि कसोटीत कर्णधार व्हायचे होते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने आता विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच मौन सोडले आहे.
एएनआयशी बोलताना गांगुली म्हणाला, “हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने मिळून घेतला आहे. खरे तर बीसीसीआयने विराटला टी-२० चे कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती, पण त्याला ते मान्य नव्हते. यानंतर, दोन भिन्न लोक मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करावेत, असे निवड समितीला वाटत नव्हते. त्यामुळे विराट कोहली केवळ कसोटी संघाचे कर्णधारपद, तर रोहित शर्मा टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये संघाचा कर्णधार असेल हे निश्चित झाले. अध्यक्ष या नात्याने मी वैयक्तिकरित्या विराटशी याबद्दल बोललो. याशिवाय निवड समितीनेही त्याच्याशी याबाबत चर्चा केली.”
हा निर्णय भारतीय क्रिकेट संघाच्या हिताचा आहे आणि रोहितच्या नेतृत्वाखाली संघ आणखी चांगली कामगिरी करेल असा विश्वासही गांगुलीने व्यक्त केला. गांगुली म्हणाला, ”आमचा रोहितच्या कर्णधारपदावर पूर्ण विश्वास आहे. बीसीसीआयलाही पूर्ण विश्वास आहे, की भारतीय क्रिकेट चांगल्या हातात आहे. एकदिवसीय कर्णधार म्हणून विराटने भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत.”
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. टी-२० विश्वचषक ही एक कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धा जिंकण्याची शेवटची संधी होती, पण येथे संघ पहिल्या फेरीतूनच बाहेर पडला. पाकिस्तानविरुद्धच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवामुळे भारतीय संघावरही कलंक लागला होता. आतापर्यंत कोणत्याही आयसीसी विश्वचषकात भारत पाकिस्तान संघाकडून पराभूत झालेला नाही.