इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना, बीसीसीआयने काल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र आगामी विश्वचषकासाठीच्या संघात कोणाला जागा मिळणार यावरुन तयार झालेला संभ्रम अद्याप कायम आहे. ऑस्ट्रेलिया दौरा आणि २३ मार्चपासून सुरु होणारं आयपीएल लक्षात घेता, विश्वचषकासाठी संभाव्य १८ खेळाडूंची यादी तयार असून गरजेनुसार खेळाडूंना संधी दिली जाईल असं स्पष्टीकरण निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी दिलं आहे.

“आम्ही विश्वचषकासाठी १८ संभाव्य खेळाडूंची यादी तयार केली आहे, आणि गरजेनुसार प्रत्येकाला संधी दिली जाईल. खेळाडूंवर अतिक्रिकेटमुळे येणारा ताण हा मुद्दाही निवड समितीच्या चर्चेत आला असून यावर आयपीएलच्या संघमालकांशी बोलून तोडगा काढला जाईल.” ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर प्रसाद पत्रकारांशी बोलत होते.

विश्वचषक लक्षात घेता आयपीएलचे संघमालक आपल्या संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार का?? याबद्दल अद्याप ठोस काहीही निर्णय झाला नाहीये. मात्र याआधी भारतीय संघातल्या खेळाडूंनी अतिक्रिकेटमुळे येणाऱ्या ताणाबद्दल चिंता व्यक्त केली असल्यामुळे यावर उपाय शोधणं बीसीसीआयसाठी क्रमप्राप्त झालं आहे. २४ फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

Story img Loader