Ranji Trophy 2024: रणजी करंडक स्पर्धेत मुंबईविरुद्धचा पराभव तामिळनाडू संघाच्या जिव्हारी लागला आहे. पराभवानंतर तामिळनाडूचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.
रणजी करंडक स्पर्धेची सर्वाधिक जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघाने सोमवारी अंतिम फेरी गाठली. घरच्या मैदानावर तामिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी पराभव करून ४८व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. तामिळनाडू संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी संघाच्या पराभवाचे नेमके कारण सामन्यानंतर सांगितलं. कुलकर्णी यांच्या परखड मतामुळे वादाला तोंड फुटलं आहे. मुंबईविरुद्धच्या उपांत्य फेरीत कर्णधार आर.साई किशोरने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या, असे तामिळनाडूच्या प्रशिक्षकांचे मत आहे. तामिळनाडू संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना तमिळनाडूचा संघ १४६ धावांवर ऑलआऊट झाला आणि हेच त्यांच्या पराभवाचे मोठे कारण ठरले.
मुंबईविरुद्ध तामिळनाडूच्या दारुण पराभवानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कुलकर्णी म्हणाले की, ‘टॉसच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता आम्ही सामना हरलो. कुलकर्णी यांनी मुंबई विरुद्ध तामिळनाडू उपांत्य फेरीदरम्यान कर्णधार साई किशोरच्या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली. हिरव्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन किशोरने एक मोठी चूक केली असे कुलकर्णी यांचे मत होतं. मुंबई क्रिकेटचा अविभाज्य घटक असणारे कुलकर्णी यंदाच्या हंगामात तामिळनाडू संघाचे प्रशिक्षक आहेत. मुंबई संघाबद्दल, त्यांच्या डावपेचांबद्दल, बीकेसीतील खेळपट्टीबद्दल कुलकर्णी यांना सखोल माहिती आहे. मुंबईच्या संघाचं प्रशिक्षकपदही त्यांनी भूषवलं आहे. कुलकर्णी यांचा अनुभव मुंबईतल्या सेमी फायनल लढतीत उपयोगी ठरेल अशी चिन्हं होती. बीकेसीतील खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. तामिळनाडूचा कर्णधार साई किशोरने नाणेफेक जिंकली मात्र त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला.
“मी नेहमी स्पष्ट बोलतो, आम्ही पहिल्या दिवशी ९ वाजता सामना हरलो. ज्या क्षणी मी विकेट पाहिली तेव्हा मला कळले की आम्हाला काय मिळणार आहे. सर्व काही तयार होतं, आम्ही नाणेफेक जिंकलो, एक प्रशिक्षक आणि एक मुंबईकर म्हणून मला परिस्थिती चांगली माहीत आहे. आम्ही गोलंदाजी करायला हवी होती पण कर्णधाराचा विचार वेगळा होता,” असे सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितलं.
“ मी पाहिलं की ते उपांत्यपूर्व फेरीत वेगळ्या खेळपट्टीवर खेळले होते आणि त्यांनी कोणती विकेट दिली होती, त्या क्षणी मला जाणवले की ही एक सीमिंग-फ्रेंडली विकेट आहे आणि हा सामना खूप कठीण असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी खरोखरच चांगले खेळावे लागेल,” कुलकर्णी पुढे म्हणाले.
साई किशोरचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय संघासाठी तामिळनाडूच्या पथ्यावर पडला नाही. तामिळनाडूच्या फलंदाजांना खेळपट्टीचा नूर समजला नाही आणि त्यांचा डाव दीडशेच्या आत आटोपला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईने त्यांच्या पहिल्या डावात ३७८ धावा केल्या. तामिळनाडूला त्यांच्या दुसऱ्या डावात केवळ १६२ धावा करता आल्या आणि रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलचा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला.
पुढे तमिळनाडूचे प्रशिक्षक म्हणाले, “शेवटी तो बॉस आहे. ही विकेट कोणत्या प्रकारची आहे आणि मुंबईची मानसिकता काय आहे यावर मी माझं मत आणि इनपुट देऊ शकतो.नाणेफेक जो जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करेल अशी आमची मानसिक तयारी होती. आम्ही प्रथम गोलंदाजी करू हे आम्हाला माहीत होते. ज्या क्षणी त्यांनी (टीव्ही ब्रॉडकास्ट) सांगितले की आम्ही प्रथम फलंदाजी करू. पण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऐकताच त्याचा फलंदाजांवर नकारात्मक परिणाम झाला आणि पहिला तासभर त्यांच्या डोक्यात तोच विचार होता.
“जेव्हा तुम्ही पहिल्या षटकात, तिसऱ्या (चौथ्या) चेंडूवर खेळायला जाता आणि तुमचा आंतरराष्ट्रीय खेळाडू बाद होतो, तेव्हा तुम्ही परिस्थिती नीट पाहता. पहिल्या तासात आम्ही खेळ आणि डाव गमावला. पुनरागमन खूप कठीण होते.”
तामिळनाडूच्या सेमी फायनलपर्यंतच्या वाटचालीत कर्णधार साई किशोरची भूमिका निर्णायक आहे. त्याने शानदार गोलंदाजी करत संघासमोर आदर्श ठेवला असं कुलकर्णी म्हणाले. सात वर्षानंतर तामिळनाडूने रणजी स्पर्धेत बाद फेरी गाठली आहे.
दरम्यान कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज आणि तामिळनाडूचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकने टीका केली आहे. प्रशिक्षक कुलकर्णी यांच्या वक्तव्याचं वाईट वाटलं. साई किशोरच्या नेतृत्वात तामिळनाडूने दमदार कामगिरी केली. मुंबईविरुद्ध त्यांची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही पण स्पर्धेतली त्यांची एकूण कामगिरी उत्तम अशी आहे. साई किशोरची गोलंदाज म्हणून कामगिरी वाखाखण्यासारखी आहे. साई किशोरच्या निर्णयामागे ठामपणे उभं राहण्याऐवजी त्यांनी त्याला एकटं पाडलं असं कार्तिक म्हणाला. सात वर्षानंतर तामिळनाडूने रणजी स्पर्धेत बाद फेरी गाठली आहे. यात साईकिशोरच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. त्याला साथ द्यायला हवी होती असं कार्तिक पुढे म्हणाला.