पाकिस्तान संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली आहे. इंग्लंडने ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना तिसऱ्या दिवशी २६ धावांनी जिंकला. पहिल्या सामन्यात पाहुण्या संघाने ७४ धावांनी विजय मिळवला होता. एकेकाळी दोन्ही सामन्यांत पाकिस्तान विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते पण शेवटी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. घरच्या मैदानावर पाकिस्तानचा हा सलग तिसरा कसोटी पराभव आहे. यापूर्वी मार्चमध्येही ऑस्ट्रेलियाने त्याचा पराभव केला होता.
दरम्यान पाकिस्तान- इंग्लंड दुसऱ्या कसोटीमध्ये भारताचा आधारस्तंभ विराट कोहलीवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे पोस्टर्स झळकले. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. शेजारच्या पाकिस्तानातही किंग कोहलीची लोकप्रियता कायम आहे. विराट कोहलीची बॅट बोलली की पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनाही त्याचा विश्वास बसतो. कोहलीने दोन दिवसांपूर्वी बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते आणि कोहलीच्या या खेळीची बरीच चर्चा झाली होती. त्याची प्रतिध्वनी शेजारी देश पाकिस्तानमध्ये ऐकू आली आणि कोहलीच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले, आता पाकिस्तानी चाहत्यांनी स्टेडियममधून कोहलीवरील प्रेम व्यक्त केले आहे.
सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुलतानमध्ये खेळला गेला, या सामन्यादरम्यान स्टेडियममधील चाहत्यांमध्ये कोहलीची क्रेझ होती. विराट कोहलीच्या चाहत्यांनी हातात पोस्टर घेऊन कोहलीला आशिया चषक २०२३मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात येण्याचे आवाहन केले. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने त्याच्या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आमच्या राजा बाबरपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करतो.”
सर्वांनाच माहिती आहे की आशिया चषक २०२३ हा पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि भारताने स्पष्ट केले आहे की आमचा संघ पाकिस्तानचा दौरा करणार नाही, ज्यामुळे पाकिस्तानचे चाहते निराश झाले आहेत. त्यामुळे स्टेडियममधील चाहते पोस्टरद्वारे कोहलीला आशिया चषकात सहभागी होण्याची विनंती करत आहेत.
पाकिस्तान-इंग्लंड दुसरा कसोटी सामना
पाकिस्तानने चौथ्या दिवसाची सुरुवात ४ बाद १९८ धावांवर केली आणि सौद शकील (९४) आणि मोहम्मद नवाज (४५) यांनी सहाव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करत यजमानांना २९०/५ पर्यंत नेले. वुडने उपाहारापूर्वीच दोन्ही सेट फलंदाजांना बाद करून इंग्लंडला सामन्यात परत आणले. त्यानंतर, आगा सलमान (नाबाद २०) आणि नवोदित अबरार अहमद (१७) यांच्या काही सुरेख फटक्यानंतरही पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. अखेर पाकिस्तानचा डाव १०२.१ षटकात ३२८ धावांवर आटोपला. यासह इंग्लंडने मालिका आपल्या नावावर केली. त्याच्याकडून मार्क वुडने ४ तर ओली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसनने २-२ बळी घेतले.