सलग दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर सुपरओव्हरमध्ये मात केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास आता दुणावलेला आहे. वेलिंग्टनच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून मनिष पांडेने फलंदाजीदरम्यान नाबाद अर्धशतक झळकावत, तर गोलंदाजीत नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांनी महत्वाची षटकं टाकत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताकडे या मालिकेत सध्या ४-० अशी विजयी आघाडी आहे. मालिकेतला अखेरचा सामना रविवारी खेळवला जाईल, या सामन्यातही भारतीय संघ विजयाच्या उद्देशानेच मैदानात उतरेल असं वक्तव्य भारताच्या मधल्या फळीतला फलंदाज मनिष पांडेने केलं आहे.

सुपरओव्हरमध्ये रंगलेल्या थराराबद्दल विचारलं असता मनिष म्हणाला, “हे आमचं ध्येयच आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत आशा सोडायचा नाही. जर प्रत्येक सामना या ध्येयाने खेळला, तर असे निकाल तुम्हाला पहायला मिळतात. आता आमच्याकडे ५-० ने ही मालिका जिंकण्याची संधी आहे, आणि हेच आमचं उद्दीष्ट असणार आहे. भारतीय संघाला अशी कामगिरी आधी करता आलेली नाहीये, त्यामुळे आमच्या संघाने असं करुन दाखवल्यास ती खरंच आश्वासक गोष्ट असेल.”

अवश्य वाचा – Ind vs NZ : पांडेजी चमकले! रैना-धोनीला टाकलं मागे

दरम्यान, अखेरच्या षटकांत शार्दुल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर सलग दुसऱ्या सामन्यात भारताने सुपरओव्हरवर विजय मिळवला आहे. वेलिंग्टनच्या मैदानावर भारताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ निर्धारीत षटकांमध्ये १६५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. यानंतर सुपरओव्हरमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा १४ धावांचं आव्हान सहज पार करत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे.

जसप्रीत बुमराहने सुपरओव्हरचं षटक टाकताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर चांगला अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. टीम सेफर्टला माघारी धाडण्यात भारताला यशही आलं, तरीही मुनरो व इतर फलंदाजांनी फटकेबाजी करत भारतासमोर १४ धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरादाखल भारताकडून लोकेश राहुलने फटकेबाजी करत पहिल्या दोन चेंडूंमध्येच १० धावा केल्या. तिसऱ्या चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या नादात राहुल माघारी परतला. मात्र विराट कोहलीने संजू सॅमसनच्या साथीने विजयी लक्ष्य पार करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.