इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघापुढे आता कसोटी मालिकेचं आव्हान असणार आहे. १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. इंग्लंडचं हवामान आणि खेळपट्ट्या या जलदगती गोलंदाजांना पोषक असतात. आतापर्यंत भारतीय संघाचा इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमधला इतिहास तितकाचा चांगला नाही. प्रत्येक पराभवानंतर भारतीय संघाकडून इंग्लंडमधील हवामान आणि खेळपट्टीवर खापर फोडलं जातं. मात्र भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आताचा भारतीय संघ, हवामान-खेळपट्टी अशी कोणतीही सबब देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – अँडरसनचं वक्तव्य निव्वळ बालीश, भारताच्या माजी खेळाडूचं प्रत्युत्तर

भारत विरुद्ध एसेक्स क्रिकेट क्लबमध्ये बुधवारपासून सराव सामना सुरु झाला आहे. एसेक्समधील खेळपट्टीबद्दल भारतीय संघ खूश नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर स्पष्टीकरण देताना रवी शास्त्रींनी आपल्या संघाची बाजू मांडली. “माझे विचार स्पष्ट आहेत. तुमच्या देशात खेळपट्टी कशी बनवायची हे मी विचारणार नाही. माझ्या देशात तुम्ही मला प्रश्न विचारु नका. खेळपट्टी कशी तयार करायची हा क्युरेटरचा प्रश्न असून यात तुम्ही लक्ष घालू नका”, असा सल्लाही रवी शास्त्री यांनी आपल्या संघाला दिला आहे.

मी ज्या भारतीय संघाला प्रशिक्षण देतोय तो संघ हवामान-खेळपट्टीबद्दल कधीही सबब देणार नाही. इंग्लंडचा पराभव करणं हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वोत्तम संघावर मात करणं यासाठी आम्ही प्रयत्न करु. शास्त्रींनी भारतीय संघाची बाजू स्पष्ट केली. टी-२० मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारताला वन-डे मालिकेत २-१ ने पराभव स्विकारावा लागला. यामुळे कसोटी मालिकेत कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader