युवराज सिंग हा आमच्या संघाचे विजय मिळविण्याचे हुकमी अस्त्र असल्यामुळेच त्याच्यावर कर्णधाराचे अतिरिक्त दडपण टाकणार नाही, असे पुणे वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक व दक्षिण आफ्रिकेचे ज्येष्ठ वेगवान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्ड यांनी सांगितले.
डोनाल्ड यांनी पुणे वॉरियर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आगामी व्यूहरचनेविषयी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्याकडे प्रथमच आयपीएल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आली आहे. हे एक मोठे आव्हान असले तरी ही जबाबदारी समर्थपणे पेलण्यास मी तयार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आमचा संघ अतिशय समतोल आहे. बाद फेरीत स्थान मिळविण्याचे आमचे पहिले लक्ष्य असेल.
मायकेल क्लार्कची अनुपस्थिती जाणवणार आहे काय, असे विचारले असता डोनाल्ड म्हणाले, क्लार्क हा सध्याचा अतिशय अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या अनुपस्थितीचा आमच्या संघावर निश्चितच परिणाम होणार आहे; मात्र तरीही आम्ही अव्वल दर्जाची कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्याऐवजी युवराज सिंग व अँजेलो मॅथ्युज यांच्या नावाचा कर्णधारपदासाठी विचार झाला होता. युवराज हा मोठय़ा आजारातून बाहेर आला आहे. त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी दिली तर त्याच्यावर दडपण येण्याची शक्यता आहे. सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळेच त्याला खेळाचा निखळ आनंद देण्याचे आम्ही ठरविले व अँजेलोकडे कर्णधारपद दिले. रॉस टेलर याच्या नावाचाही विचार झाला होता, मात्र काही सामने तो खेळू शकणार नसल्यामुळे प्रत्येक सामना जो खेळाडू खेळणार आहे अशाच अनुभवी खेळाडूवर नेतृत्वाची जबाबदारी देण्याचे आम्ही ठरविले.
श्रीलंकेच्या खेळाडूंच्या संभाव्य बहिष्काराबाबत डोनाल्ड यांनी सांगितले की, लंकेच्या खेळाडूंमध्ये अतिशय नैपुण्य आहे, त्यामुळेच ते नसतील तर आयपीएल स्पर्धा परिपूर्ण होणार नाही. अँजेलो हा अतिशय निष्णात अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. अजंथा मेंडीस हा अव्वल  फिरकी गोलंदाज आहे. कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी कामगिरी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

Story img Loader