जगभरासह भारतात PUBG या खेळाने सध्या धुमाकूळ घातला आहे. देशातला तरुणवर्ग या खेळाच्या आहारी जात आहे, याबाबत अनेक जणांनी चिंता व्यक्त केली आहे. PUBG च्या आहारी जाऊन काही मुलांनी आत्महत्या करुन आपलं जिवनही संपवलं आहे. मात्र आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन केलं तर ते लवकरच यामधून बाहेर पडू शकतात याचं उदाहरण दिव्यांश सिंह पनवारने घालून दिलं आहे. चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत १७ वर्षीय दिव्यांश सिंहने १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई करत ऑलिम्पिक कोटा मिळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१७ साली दिव्यांशही आपल्या वयातील मुलांप्रमाणे PUBG खेळाच्या आहारी केला होता. आपल्या मुलाला या ऑनलाईन खेळाच्या व्यसनामधून बाहेर काढण्यासाठी दिव्यांशचे वडील अशोक पनवार यांनी दिव्यांशला दिल्लीच्या कर्णी सिंह शूटींग रेंजमध्ये दाखल केलं. ऑनलाईन बंदूकींच्या प्रेमात पडलेल्या दिव्यांशने इथेही आपल्या मेहनतीने या खेळावर आपलं प्रभुत्व मिळवलं. प्रशिक्षक दिपक कुमार दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्ष सराव करत दिव्यांशने भारतासाठी रौप्यपदकाची कमाई करत २०२० ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे.

अवश्य वाचा –  ISSF World Cup : १६ वर्षीय दिव्यांशने कमावला ऑलिम्पिक कोटा, रौप्यपदकाची कमाई

“तो लहानपणी सतत PUBG खेळत बसायचा तेव्हा आम्ही काळजीपोटी त्याला सतत ओरडायचो. या काळात त्याचं अभ्यासाकडे व इतर बाबींकडेही दुर्लक्ष व्हायचं. त्याची अंतिम फेरी आम्ही ऑनलाईन पाहिली, मात्र पदक जिंकल्यानंतर त्याने नक्कीच एकदा PUBG गेम खेळला असेल.” अशोक पनवार इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दिव्यांशनेही आपल्यावरची जबाबदारी वाढली असल्याचं मान्य केलं. “लहानपणी असताना मला PUBG खेळायला खूप आवडायचं. आता मला नेमबाजी करताना प्रचंड मजा येते, मी जास्तीत जास्त वेळ याचा सराव करत असतो. देशासाठी पदक मिळवणं हे माझं स्वप्न होतं, आणि ते मी आज पूर्ण केलं याचा मला आनंद आहे”, दिव्यांश बोलत होता. भविष्यात अभिनव बिंद्राला भेटण्याची आपली इच्छा असल्याचंही दिव्यांश म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weaned away from pubg divyansh panwar shoots his way to olympics