अनुकूल खेळपट्टी व वातावरण, प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा भारताला मिळणार असला तरी इंग्लंडकडेही अनुभवी खेळाडूंची कमतरता नाही हे लक्षात घेऊनच त्यांच्याविरुद्ध आपण गाफील राहणे आत्मघातकी ठरेल, हा कानमंत्र दिला आहे ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी. भारत व इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला १५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. बोर्डे यांनी भारतीय निवड समितीचे अध्यक्ष, तसेच इंग्लंडला गेलेल्या भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. साहजिकच त्यांना इंग्लिश खेळाडूंची शैली, सवयी, तंत्र आदीबाबत सखोल अभ्यास आहे. आगामी कसोटी मालिकेनिमित्त त्यांनी ‘लोकसत्ता’शी दिलखुलासपणे गप्पा मारल्या.
भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा कितपत फायदा मिळणार आहे?
घरच्या मैदानावर खेळताना आपल्या खेळाडूंना अनुकूल खेळपट्टी, वातावरण याचा फायदा मिळणार आहे. तसेच कसोटी सामन्यांना प्रेक्षकांची भरघोस उपस्थिती असते. साहजिकच इंग्लंडवर आपण मानसिक दडपण ठेवू शकतो. तरीही इंग्लंडचे खेळाडू व्यावसायिक दृष्टिकोनातून खेळत असल्यामुळे पूर्वीइतके मानसिक दडपण त्यांच्यावर राहणार नाही. त्यामुळे आपण त्यांना सहज पराभूत करू अशा भ्रमात भारतीय खेळाडूंनी राहू नये.
घरच्या मैदानावर फिरकी गोलंदाजी हे भारताचे मुख्य अस्त्र असते त्याचा यंदा किती फायदा होईल?
इंग्लंडच्या तुलनेत आपल्याकडे प्रभावी फिरकी मारा आहे. रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग यांच्याबरोबरच युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग आदी पूरक गोलंदाजही विकेट्स मिळविण्याबाबत माहीर मानले जातात. मात्र खेळपट्टी कशी असणार आहे यावरच संघाची व्यूहरचना असेल. इंग्लंडकडेही फिरकी गोलंदाजांवर प्रभुत्व गाजविणारे अनुभवी फलंदाज आहेत. त्यामुळे आपल्या गोलंदाजांनी दिशा, टप्पा तसेच प्रतिस्पर्धी फलंदाजाचा कमकुवतपणा लक्षात घेऊन त्यानुसार गोलंदाजी केली पाहिजे तरच ते संघास यश मिळवून देतील.
इंग्लंडच्या खेळाडूंनी कसोटीपूर्वी भारतात भरपूर सराव केला आहे. त्याचा फायदा त्यांना किती मिळू शकेल?
इंग्लंडने तीन सामन्यांचा सराव केला आहे असे असले तरी प्रत्यक्ष सामन्यात भारतीय गोलंदाज किंवा फलंदाजांविरुद्ध कशी व्यूहरचना ठरवितात व त्याची अंमलबजावणी करतात यावरच त्यांचे यश अवलंबून राहील. पूर्वी आमच्या वेळी व्हिडीओ तंत्र उपलब्ध नव्हते, आता मात्र हे तंत्र सहज उपलब्ध असल्यामुळे आपल्या खेळाडूंमधील कमकुवतपणाचा अभ्यास त्यांनी केला असणार.
युवराज सिंग व हरभजन सिंग यांच्या पुनरागमनाविषयी काय सांगता येईल?
युवराज हा कर्करोगातून बरा होऊन पुन्हा भारतीय संघात आला आहे. त्यानंतर त्याने दुलीप सामन्यात शानदार कामगिरी करीत आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. तो अतिशय जिद्दी व बुद्धिमान खेळाडू आहे. अनुभवाच्या जोरावर तो निश्चित चांगली कामगिरी करील अशी आशा करायला हरकत नाही. सर्वाना सामावून घेण्याची व परिस्थितीनुसार सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. हरभजन याला पुन्हा सूर गवसला आहे. संघातील पुनरागमनाचा फायदा त्याने घेतला पाहिजे.
राहुल द्रविड व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या निवृत्तीमुळे संघात पोकळी निर्माण झाली आहे काय?
द्रविड व लक्ष्मण हे खरोखरच महान खेळाडू आहेत, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत पोकळी जाणवेल असे मला वाटत नाही. कारण आता त्यांच्या जागी आलेले चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आदी युवा खेळाडू चमक दाखवू लागले आहेत. मात्र संघातील स्थान बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्य राखले पाहिजे.
गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग ही सलामीची जोडी आता अपयशी ठरत आहे त्याबाबत काय सांगता येईल?
गंभीर व सेहवाग यांच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मात्र घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. त्यांच्या जागी येऊ इच्छिणारे अनेक खेळाडू संघाची दारे ठोठावत आहेत हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. कदाचित घरच्या मैदानावर ही आपली अखेरची कसोटी मालिका असणार आहे याचे दडपण गंभीर व सेहवाग यांच्यावर राहणार आहे.
नवोदित किंवा उदयोन्मुख खेळाडूंसाठी ही मालिका भावी कारकीर्दीसाठी उपयुक्त होईल काय?
हो निश्चितच. युवा खेळाडूंनी आलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. संघातील अनेक ज्येष्ठ खेळाडू एक-दोन वर्षांत निवृत्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन उदयोन्मुख खेळाडूंनी संघातील आपले स्थान भक्कम करण्यासाठी या मालिकेचा उपयोग केला पाहिजे.