|| तुषार वैती

तेजस्विनी सावंत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नेमबाज चमकदार कामगिरी करत आहेत. आता टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांचे वर्चस्व पाहायला मिळेल. ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी इतिहास घडवतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि ‘लोकसत्ता’च्या ‘तरुण तेजांकित’ पुरस्काराची मानकरी तेजस्विनी सावंत हिने व्यक्त केला.

कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंत हिने काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात मिश्र सांघिक गटात संजीव राजपूत याच्यासह देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. तीन महिन्यांनी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकच्या तयारीविषयी तसेच भारतीय नेमबाजांच्या कामगिरीविषयी तेजस्विनीशी केलेली ही बातचीत –

’ गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी हुकल्यानंतर यंदा टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याच्या काय भावना आहेत?

२००८च्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी पात्र ठरता न आल्याने मी खूप दु:खी झाले होते. काहीसे नैराश्य आले होते. पण २००९पासून प्रशिक्षिका कुहेली गांगुली यांच्याकडे प्रशिक्षण घेऊ लागल्यापासून त्यांनी माझी विचारसरणीच बदलून टाकली. त्यानंतरच्या दोन ऑलिम्पिकसाठी पात्र न ठरल्याचे मला फारसे दु:ख झाले नाही. टोक्यो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली असली तरी राष्ट्रकुल किंवा आशियाई स्पर्धेसारख्याच प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरल्याचा आनंद मला झाला आहे.

’ टाळेबंदीचा सरावावर कितपत परिणाम झाला?

टाळेबंदीचा अनेक खेळाडूंना खूप फटका बसला. मी सासरी पुण्यात असते तर मलाही खूप फरक पडला असता. घरापासून ११ किलोमीटर अंतरावर नेमबाजी केंद्र असल्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला बऱ्याच उलाढाली कराव्या लागल्या असत्या. सुदैवाने मी माहेरी कोल्हापूरमध्ये होते. घरीच छोटीशी १० मीटरची रेंज असल्यामुळे माझ्या सरावात व्यत्यय आला नाही. करोनामुळे ऑलिम्पिकआधी नेमबाजांच्या परदेशवाऱ्या स्थगित झाल्या असल्या तरी भारतातच सराव करण्याचे आम्ही ठरवले होते. टोक्यो आणि देशातील वातावरण जवळपास सारखेच असल्याने तेथील वातावरणाशी सहज जुळवून घेता येणे शक्य आहे. आता पुढील काही महिने आम्ही कसून सराव करणार आहोत.

’ अलीकडेच झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तुझी कामगिरी अपेक्षेप्रमाणे होती का आणि ऑलिम्पिकची तयारी कशी सुरू आहे?

नवी दिल्लीत झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात माझी कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही. त्यानंतर रात्री प्रशिक्षक गांगुली यांच्याशी फोनवरून संभाषण साधत नेमक्या कुठे चुका होत आहेत, यावर विचारविनिमय केला. याचा मला खूप चांगला फायदा झाला, नंतर सांघिक प्रकारात मी सुवर्णपदर्क जिंकू शकले. ऑलिम्पिकसाठी नेहमीसारखीच तयारी सुरू आहे. इतकी वर्षे आम्ही सराव करत असल्यामुळे ऑलिम्पिकसाठी विशेष असा सराव सुरू नाही. फक्त नियोजनबद्ध सराव करून तांत्रिकदृष्ट्या कामगिरी कशी सुधारायची, यावर आमचा भर असतो.

’ यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून काय अपेक्षा आहेत?

नेमबाजीत पदकांची खात्री नक्कीच बाळगता येईल. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नेमबाजांची कामगिरी खूप चांगली होत आहे. जवळपास प्रत्येक प्रकारात भारतीय नेमबाजांनी आपला दबदबा राखला आहे. फक्त खेळाडूंची कामगिरी सुधारली नसून त्यांच्या विचारसरणीत आणि प्रक्रियेत बदल झाला आहे. माजी नेमबाजच प्रशिक्षक झाल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा युवा खेळाडूंना होत आहे. युवा नेमबाज खूप चांगली कामगिरी करू लागले आहेत. मनू भाकर, सौरभ चौधरी, दिव्यांश सिंह पनवार, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, चिंकी यादव यांसारखे खेळाडू भारताचे भवितव्य आहेत. देशातील नेमबाजांमध्येच स्पर्धा इतकी तीव्र झाल्यामुळे आम्हाला परदेशी नेमबाजांचे दडपण येत नाही.

’ ऑलिम्पिकमध्ये तुझ्या स्वत:च्या काय अपेक्षा आहेत?

वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी साकारणे हे माझे ध्येय आहे. कोणत्याही स्पर्धेत उतरल्यावर पदक पटकावणे हे खेळाडूचे स्वप्न असते. मात्र ऑलिम्पिकमध्ये देशाचा तिरंगा डौलाने फडकताना पाहणे माझे स्वप्न आहे. त्यासाठी सुवर्णपदक पटकावण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आतापासूनच माझी तयारी सुरू आहे. हे स्वप्न साकारताना मी नक्कीच यशस्वी होईन, असा विश्वास आहे.

Story img Loader