बॅडमिंटनमध्ये एकेरीप्रमाणेच दुहेरीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामध्ये ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी संघाला अनुभवी परदेशी प्रशिक्षकाची आवश्यकता आहे, असे भारताची ऑलिम्पिकपटू अश्विनी पोनप्पाने सांगितले.
अश्विनीने जागतिक स्पर्धेत ज्वाला गट्टाच्या साथीने कांस्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली होती. तसेच तिने ज्वालासोबत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या दुहेरीमध्ये सोनेरी कामगिरी केली होती. आता ती प्रज्ञा गद्रेसोबत महिला दुहेरीमध्ये खेळत आहे. प्रज्ञाबरोबर खेळण्याच्या निर्णयाबाबत तसेच एकूणच बॅडमिंटन कारकिर्दीविषयी तिने केलेली बातचीत-
प्रज्ञाबरोबर खेळताना काय फरक जाणवत आहे?
ज्वाला ही डावखुरी खेळाडू आहे. त्यामुळे तिच्यासोबत खेळताना अधिक आत्मविश्वासाने खेळ होत असे. अर्थात प्रज्ञाबरोबर चांगला समन्वय जमू लागला आहे. आमच्या जोडीमध्ये मी अनुभवाने वरिष्ठ असल्यामुळे मी सांगेन त्यानुसार प्रज्ञा आपल्या शैलीत बदल घडवत असते. प्रज्ञापेक्षा ज्वाला ही कितीतरी पटीने अनुभवी खेळाडू आहे. तथापि, प्रज्ञाही गुणवान खेळाडू असल्यामुळे मला फारशी अडचण येणार नाही. मी बॅककोर्टवरील फटक्यांवर चांगल्या रीतीने नियंत्रण ठेवू शकते, तर प्रज्ञाची नेटजवळून प्लेसिंगमध्ये अधिक हुकमत आहे.
नजीकचे कोणते ध्येय आहे आणि त्यामध्ये काय अपेक्षा आहेत?
ऑगस्टमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा आमच्यासाठी खरी परीक्षा राहणार आहे. या स्पर्धेत आम्हाला चीन, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आदी देशांच्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे. त्यादृष्टीने आम्ही सरावावर अधिक लक्ष केंद्रित करीत आहोत. या स्पर्धेपूर्वी हैदराबाद येथे गोपीचंद यांच्या अकादमीत आमचा सराव होणार आहे.
तू सध्या टॉम जॉन यांच्याही मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याचा फायदा तुला कसा मिळत आहे?
टॉम जॉन हे मूळचे भारतीय असले तरी त्यांनी अनेक वर्षे इंग्लंडमध्ये खेळण्याचा व प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव घेतला आहे. दुहेरीत खेळताना कोणती शैली आवश्यक आहे. कोठे आपण कमी पडतो, याचे ते चांगल्या रीतीने मार्गदर्शन करीत आहेत. परंतु परदेशातील प्रशिक्षणाचा व परदेशी मार्गदर्शकांद्वारे सराव शिबीर आयोजित केले गेले तर त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना निश्चित होणार आहे. मिश्र दुहेरी व महिला दुहेरीत आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्यवान कामगिरी करणारे अनेक खेळाडू भारतात आहेत.
एकेरीत खेळायला आवडते काय?
एकेरीत अखिल भारतीय स्तरावर काही सामने खेळले आहे. मात्र दुहेरीत अधिक जम बसल्यानंतर त्याकडेच मी लक्ष केंद्रित केले आहे. मात्र एकेरीतही पुन्हा खेळायला सुरुवात केली पाहिजे, असे विचार आता माझ्या मनात येऊ लागले आहेत. कारण एकेरीमुळे आपल्या खेळातील चुका ओळखण्यास मदत होते.
ज्वाला हिने दुहेरीत भारतीय बॅडमिंटन असोसिएशनकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे विधान केले होते. त्या मताशी तू सहमत आहेस काय?
हो, कारण राष्ट्रकुल व जागतिक या दोन्ही स्पर्धामधील पदकांनंतरही आम्हाला फारशी अनुकूल स्थिती जाणवलेली नाही. मान-सन्मान, प्रायोजकत्व आदी गोष्टींबाबत दुहेरीतील खेळाडूंना सतत भांडावे लागते आणि मगच आपल्या काही मागण्या पूर्ण होतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. मला ओएनजीसीकडून अतिशय प्रोत्साहन मिळते. मात्र भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने दुहेरीतील खेळाडूंनाही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.
बॅडमिंटनमध्ये गेल्या सात-आठ वर्षांमध्ये काय फरक जाणवत आहे?
सायना नेहवालमुळे बॅडमिंटन क्षेत्रात क्रांती घडली आहे. या खेळात आपण कारकीर्द घडवू शकतो, याची जाणीव अनेक लहान मुलींमध्ये होऊ लागली आहे. सुदैवाने पालकांमध्येही सकारात्मक बदल जाणवत आहे. बॅडमिंटनविषयी अनेक अनुकूल बदल होत आहेत. शासनाचेही चांगले सहकार्य मिळू लागले आहे.
लंडन येथील ऑलिम्पिक स्पर्धेत पदक हुकल्याचे शल्य जाणवत असेल ना?
ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न मी पाहिले होते आणि ज्वालाच्या साथीने लंडन ऑलिम्पिकमध्ये मी या स्वप्नाजवळ पोहोचले होते. मात्र ही संधी हुकल्याचे शल्य अजूनही जाणवते. अर्थात अजूनही मला बरीच संधी आहे आणि हे स्वप्न मी निश्चितपणे साकार करीन अशी मला खात्री आहे.

Story img Loader