संदीप सिंग म्हणजे भारतीय हॉकी संघातील हुकमी एक्का. अनेक स्पर्धामध्ये भारताला यश मिळवून देण्यात संदीपचा मोलाचा वाटा आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सर्वाधिक गोल रचून स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या संदीपला लंडन ऑलिम्पिकमध्ये मात्र आपला जलवा दाखवता आला नाही. चेंडूवर नियंत्रण मिळण्यात आलेले अपयश आणि तंदुरुस्ती अशा कारणांमुळे संदीपची भारतीय संघातून गच्छंती झाली आहे. आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करून आपल्या जिद्दीच्या जोरावर संघात पुनरागमन करणारा खेळाडू अशी संदीपची ख्याती आहे. भारतीय संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू असलेला संदीप आता हॉकी इंडिया लीग स्पर्धेद्वारे भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी आणि आपली कारकीर्द रुळावर आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
*  २००६मध्ये जर्मनीला होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेच्या दोन दिवस आधी अपघाताने तुला बंदुकीची गोळी लागली. त्यानंतर सुमारे दोन वष्रे तुला व्हील चेअरचे सहाय्य घ्यावे लागले. आयुष्याची ही लढाई जिंकून तू नुसताच बरा झाला नाहीस, तर भारतीय संघात पुन्हा आपले स्थानही निर्माण केलेस?
२००४मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर या विचित्र अपघातात माझी कारकीर्द संपुष्टात येणार की काय, अशी मला भीती वाटत होती. कारण त्या अपघातानंतर भारतीय संघात पुनरागमन करणे कठीण होते; पण कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे मी पुन्हा उभा राहू शकलो. एका दिवसात, एका महिन्यात पुनरागमन करणे शक्य नव्हते. माझ्या आयुष्यातील खडतर परिस्थितीनंतर कठोर मेहनतीमुळे मी पुन्हा भारतीय संघातर्फे खेळू शकलो. त्याचबरोबर आधीपेक्षाही चांगली कामगिरी करू शकलो, याचे समाधान अधिक आहे.
*  ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तू सर्वाधिक गोल केलेस, पण ऑलिम्पिकमध्ये कामगिरी खालावण्याची काय कारणे होती?
संपूर्ण भारतीय संघ या स्पर्धेत चांगला खेळला नाही, हेच भारताच्या अपयशामागील प्रमुख कारण आहे. ऑलिम्पिकआधीच आम्ही शिखरावर होतो. त्या वेळी आम्ही कोणत्याही संघाविरुद्ध चांगली कामगिरी करू शकलो असतो. लंडन ऑलिम्पिकआधी आम्ही लागोपाठ चार स्पर्धामध्ये खेळलो होते. त्याचा परिणाम तंदुरुस्ती आणि तंत्रावर झाला. म्हणूनच माझ्यासह सर्वानाच लंडन ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.
*  तुझी वैयक्तिक कामगिरी सध्या खालावू लागली आहे, त्याबाबत तुझे मत काय आहे?
चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात मी काही वेळा अपयशी ठरलो आहे, हे नक्की. त्यामुळे लोकांच्या टीकेवर मी फारसे लक्ष देत नाही. प्रत्येक स्पर्धेदरम्यान आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यावर माझा भर असतो. त्यामुळे मला पुन्हा संधी मिळाल्यास, आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा मी प्रयत्न करेन.
* तू कोणते उद्दिष्ट समोर ठेवले आहेस?
हॉकी इंडिया लीगच्या निमित्ताने देशातील युवा हॉकीपटूंना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत अनेक ऑलिम्पिकपटू आणि आंतरराष्ट्रीय हॉकीपटू खेळणार आहेत. त्यांच्याबरोबर चांगली कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवणे, हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी हॉकी इंडिया लीग हे माझ्यासाठी योग्य व्यासपीठ आहे, असे मी म्हणेन. पुन्हा एकदा मैदानावर आपला जलवा दाखवण्यासाठी मी सज्ज झालो आहे. भारतीय संघाबाहेर असल्याच्या वेदना होत असल्या तरी आपल्या मेहनतीच्या जोरावर संघात स्थान मिळवण्याचा मी प्रयत्न करेन.
*  मुंबई मॅजिशियन्स संघाबद्दल काय सांगशील?
मुंबई मॅजिशियन्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली असून आमचा संघ समतोल आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानातील प्रत्येकी चार तसेच मलेशियाचा एक असे नऊ परदेशी खेळाडू आमच्या संघात आहेत. जगातील सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये गणले जाणारे रिक चाल्सवर्थ हे प्रशिक्षक आम्हाला लाभले आहेत. त्याचबरोबर युवा भारतीय हॉकीपटूही आमच्याकडे आहेत. युवा आणि अनुभवी खेळाडू असा समतोल संघ आम्ही निवडला आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही मुंबई हॉकी असोसिएशनच्या महिंद्रा स्टेडियमवर कसून सराव करत आहोत. अनेक अव्वल आंतरराष्ट्रीय हॉकीपटू या स्पर्धेत सहभागी होणार असल्यामुळे आमच्यासमोरील आव्हान खडतर आहे.
*  खेळाडूंच्या लिलावात तुला कमी किंमत मिळाली, याबद्दल काय सांगशील?
गेल्या काही सामन्यांतील खराब कामगिरीमुळे मला १५.१३ लाख इतकीच रक्कम मिळाली, त्याचे वाईट जरूर वाटले. यापेक्षा अधिक किमतीची मला अपेक्षा होती. लिलावादरम्यान फ्रँचायझींच्या मनात माझ्याविषयी काय होते, हे मला अद्याप कळले नाही. पण स्पर्धेदरम्यान चांगली कामगिरी करण्यावरच माझा भर राहील.