ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या एक दिवसाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ अष्टपैलू खेळाडूंच्या समावेशामुळे अतिशय समतोल झाला आहे, असे ज्येष्ठ क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावसकर यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी रवींद्र जडेजा व स्टुअर्ट बिन्नी या अष्टपैलू खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्यांच्यासह संघात असलेले अन्य अष्टपैलू खेळाडू महत्त्वाची कामगिरी करतील असे सांगून गावसकर म्हणाले, फलंदाजीवरच भारतीय संघाचे यश अवलंबून आहे. गत वेळी अष्टपैलू खेळाडूं्च्या कामगिरीमुळेच भारतास विजेतेपद मिळाले होते. हे विजेतेपद राखण्यासाठी जडेजा, बिन्नी, रविचंद्रन अश्विन व सुरेश रैना हे खेळाडू संघाचे आधारस्तंभ असतील. भारताची फलंदाजी खोलवर आहे व गोलंदाज तेथील खेळपट्टीवर चांगले यश मिळवू शकतील अशी मला खात्री आहे.
संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन याचे स्थान कायम राहिले आहे. त्याबद्दल गावसकर म्हणाले, मुरली विजयपेक्षाही मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये धवन हा चांगली फटकेबाजी करू शकतो. त्यामुळेच त्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
स्टुअर्ट बिन्नी याचे वडील रॉजर हे निवड समितीचे सदस्य असल्यामुळे त्याची संघात वर्णी लागली, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबत गावसकर म्हणाले, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ांवर तो प्रभावी गोलंदाजी करू शकेल असा माझा अंदाज आहे. तसेच शेवटच्या फळीत तो खेळत असल्यामुळे त्याच्याकडून उपयुक्त फलंदाजीही होऊ शकते हे त्याने दाखवून दिले आहे. त्याने मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये सातत्याने विकेट्स घेतल्या आहेत. अक्षर पटेल व जडेजा हे संघात असले, तरी बिन्नी हा त्यांच्यापेक्षाही चांगला फलंदाज आहे.