कोलकाता : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू सुनील नरेन आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर ठाम असून आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. नरेनने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना ऑगस्ट २०१९ मध्ये खेळला होता.
यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्याचा वेस्ट इंडिजचे क्रिकेट मंडळाचा मानस आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पुनरागमनाचे दार आता बंद झाल्याचे नरेनने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>CSK vs LSG : मार्कस स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर लखनऊने चेन्नईचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा, ऋतुराजची खेळी ठरली व्यर्थ
सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना नरेनने सलामीला खेळताना सात सामन्यांत १७६.५४च्या स्ट्राइक रेटने २८६ धावा केल्या आहेत. यात एकेक शतक आणि अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच आपल्या फिरकी गोलंदाजीने त्याने सात सामन्यांत नऊ गडी बाद केले आहेत.
‘‘मी अलीकडे केलेली कामगिरी अनेकांना भावली आणि मी आंतरराष्ट्रीय निवृत्तीमागे घेऊन आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे. मात्र, मी आंतरराष्ट्रीय निवृत्तीच्या निर्णयावर ठाम आहे. मला कोणालाही निराश करायचे नाही, पण आता आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची दारे बंद झाली आहेत. जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकात जे खेळाडू वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करतील, त्यांना मी बाहेरून समर्थन करेन,’’ असे नरेनने आपल्या ‘इन्स्टाग्राम’वरील पोस्टमध्ये लिहिले.