टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा शेवटचा सामना खेळून ड्वेन ब्रावो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात ब्रावो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ब्रावोने १० चेंडूत ८ धावा केल्या. तसेच बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची भेट घेत आंद्रे रसेलची गळाभेट घेतली. त्याचबरोबर प्रेक्षकांचा अभिवादन स्वीकारून डगआउटमध्ये परतला. त्यानंतर गोलंदाजीसाठी संघ मैदानात उतरला, तेव्हा खेळाडूंनी ब्रावोला गार्ड ऑफ ऑनर दिला. ब्रावोने यावेळी खेळाडूंची गळाभेट घेतली. शेवटच्या सामन्यात ब्रावोने गोलंदाजी करताना ४ षटकात ३६ धावा दिल्या. मात्र एकही गडी बाद करता आला नाही.
ब्रावोने २०१२ आणि २०१६ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रावोना ४० कसोटी, १६४ एकदिवसीय आणि ९१ टी २० सामने खेळला आहे. या दरम्याने ब्रावोने ६,४२१ धावा आणि ३६३ गडी बाद केले आहेत. टी २० मध्ये ब्रावोने सर्वाधिक गडी बाद करण्यचा विक्रम केला आहे.
ब्रावोनंतर यूनिवर्स बॉस ख्रिस गेलनेही निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी त्यालाही स्टँडिग ओवेशन दिलं. डावखुऱ्या ख्रिस गेलने आपल्या साथीदार आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारलं. तसेच बॅट वर करून प्रेमपूर्वक स्वीकार केला. यामुळे आता ख्रिस गेलही निवृत्ती घेणार, असं सांगितलं जात आहे. मात्र अजूनही ख्रिस गेलने अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केलेली नाही.
दोन वेळा टी २० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा ख्रिस गेल सदस्य होता. ख्रिस गेलने वेस्ट इंडिजसाठी ७९ टी २० सामने खेळला आहे. या दरम्यान त्याने १,८९९ धावा केल्या आहेत. गेलने टी २० सामन्यात २ शतकं आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच १९ गडी बाद केले आहेत.