Virat Kohli, IND vs WI: क्वीन्स पार्क ओव्हल येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ना विशेष धावा झाल्या ना खूप विकेट्स पडल्या. भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने दिवसाचा खेळ संपेपर्यंत एका विकेटच्या मोबदल्यात ५६ धावा केल्या आहेत. कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि कर्क मॅकेन्झी नाबाद आहेत. पहिल्या डावात वेस्ट इंडिज अजूनही भारतापेक्षा ३५२ धावांनी पिछाडीवर आहे. जिथे पहिल्या दिवशी २८८ धावा झाल्या आणि चार विकेट्स पडल्या तिथे २३६ धावा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सात विकेट्स पडल्या. ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराट कोहलीच्या शतकामुळे ही कसोटी खास बनली आहे.
त्रिनिदाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने शानदार शतक पूर्ण केले. त्याने २०६ चेंडूंचा सामना करत १२१ धावा केल्या. कोहलीच्या खेळीत ११ चौकारांचा समावेश होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. शतकानंतर कोहलीने सहकारी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बीसीसीआयने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये वेस्ट इंडीजच्या चाहत्यांनी विराट कोहलीचे कौतुक केले आहे.
विराट कोहलीच्या या अफलातून शतकी खेळीची वेस्ट इंडीजच्या चाहत्यांना भुरळ पडली आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका चाहत्याने म्हटले की, “विराट हा मॅजेस्टिक किंग कोहली असून त्याने त्याच्या शतकी खेळीने आम्हाला मंत्रमुग्ध केले.” असे म्हणत त्याला सलाम केला. दुसऱ्या चाहत्याने त्याला मिस्टर विराट कोहली सर अशी उपाधी देत आम्हाला आनंद दिला असे म्हटले. तो चाहता म्हणाला, “तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकाराच्या क्रिकेटमध्ये जगातील एक सर्वोतम फलंदाज आहे. तो क्रिकेटचा किंग असून आजच्या त्याच्या अप्रतिम फलंदाजीने आम्ही खूप आनंदी झालो आहोत. जगातील कुठलेही असे मैदान क्वचितच राहिले असेल जिथे त्याने शतक झळकावले नसेल. त्याच्याशी हस्तांदोलन करतानाचा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.”
विराटचे कौतुक करण्यात भारतीय चाहते सुद्धा त्यावेळी पुढे आले. एक चाहता तर अमेरिकतील शिकागो इथून त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आला होता. त्याचवेळी एक कोहलीचा छोटा चाहता त्याच्या समोर गेला आणि त्याने त्याला बंद पाकिटात एक गिफ्ट दिले. त्याने देखील यावेळी त्याच्या भावना शब्दात व्यक्त केल्या. वेस्ट इंडीज एका चाहता म्हणाला की, “विराट कोहलीच्या फलंदाजीत सातत्य आहे. तो नेहमी ७०,८०,९० धावा हे शतकात रुपांतर करतो. जेव्हा तो निवृत्त होतील तेव्हा त्याने जगातील सर्व महान फलंदाजांचे विक्रम मोडलेले असतील. त्याला स्टेडियममध्ये बसून त्याची फलंदाजी पाहतानाचा अनुभव आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही.”
कोणत्या ठिकाणी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके?
पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे विराटचे हे चौथे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. पोर्ट ऑफ स्पेन व्यतिरिक्त त्याने विशाखापट्टणम, ढाका आणि नागपूर येथे प्रत्येकी चार आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्याने अॅडलेड ओव्हलवर एकाच ठिकाणी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. तेथे त्याने पाच शतके झळकावली आहेत.