India vs West Indies: आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३मध्ये स्थान मिळवण्यासाठी वेस्ट इंडिज सध्या झिम्बाब्वे येथे वर्ल्डकप २०२३ पात्रता फेरीत सहभागी झाला आहे. विश्वचषक २०२३ पात्रता फेरी ९ जुलै रोजी संपणार असून त्यानंतर भारताचा वेस्ट इंडीज दौरा सुरु होणार आहे. १२ जुलैपासून कसोटी मालिकेला डोमिनिका येथे सुरूवात होणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी दिवसात लगेचच दुसरी मालिका खेळायची याचे विंडीज बोर्डासमोर मोठे आव्हान आहे.
असे हे व्यस्त वेळापत्रक क्रिकेट वेस्ट इंडीज बोर्ड आणि त्यांच्या संघातील खेळाडूंसाठी एक मोठी समस्या सिद्ध होत आहे, कारण संघातील खेळाडूंना विश्रांतीसाठी फक्त एक दिवस मिळणार आहे. माहितीसाठी की, या वेळापत्रकाचा सर्वाधिक परिणाम जेसन होल्डर, काइल मेयर्स, रोस्टन चेस आणि अल्झारी जोसेफ यांसारखे वेस्ट इंडिजच्या मल्टी-फॉर्मेट स्टार खेळाडूंना होईल.
वेस्ट इंडीज संघाचे मुख्य ध्येय वर्ल्डकप क्रिकेट क्वालिफायरच्या अंतिम फेरीत पोहोचणे आहे
मात्र, क्रिकेट वेस्ट इंडिज बोर्डने म्हटले आहे की, “ते परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेत आहेत.” त्याच वेळी, विंडीज बोर्ड अधिकाऱ्याने खुलासा केला आहे की, “याक्षणी त्यांचे मुख्य लक्ष २०२३च्या विश्वचषक पात्रता फेरीवर आहे आणि जोपर्यंत टीम इंडिया विरुद्ध मायदेशातील मालिकेचा प्रश्न आहे, त्यासाठी आमच्याकडे बरेच पर्याय आहेत.”
विंडीज बोर्डासाठी सर्वात मोठी समस्या अशी आहे की झिम्बाब्वेमधील हरारे ते कॅरिबियन बेटाची राजधानी रोसेओ या आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या प्रवासासाठी सुमारे दोन दिवस लागतात, त्यामुळे खेळाडूंना पोहचताच १२ जुलै रोजी मैदानात भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरावे लागेल आणि तेही कसोटी सामना असल्याने खूप कठीण होईल.
विंडीज बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने क्रिकबझशी बोलताना सांगितले की, “आमच्याकडे अनेक पर्याय आहेत, परंतु सर्व प्रथम आमच्यासाठी २०२३च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होणे अधिक महत्त्वाचे समजतो. त्यामुळे आमचे काही खेळाडू पहिल्या सामन्यात सहभागी होणार नाहीत. पण आधी आम्ही विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो आहोत याची खात्री करावी लागेल.”
भारतीय संघ १ जुलैपर्यंत वेस्ट इंडिजला पोहोचेल
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघासमोर अशी कोणतीही अडचण नाही कारण त्यांची अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पहिल्या कसोटीच्या किमान १० दिवस अगोदर टीम इंडिया कॅरेबियन बेटावर पोहोचेल. तिथे जाऊन तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. भारतीय संघ १ जुलैपर्यंत वेस्ट इंडिजला पोहोचेल.