दोन्ही डावांत शतके झळकावणारा पॉवेल ठरला सामनावीर
वेगवान गोलंदाज टिनो बेस्टने पाच बळी घेत बांगलादेशचा दुसरा डाव गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळेच शेर-ए-बांगला स्टेडियमवरील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा ७७ धावांनी पराभव केला. दोन्ही डावांत शतके झळकावणाऱ्या किरान पॉवेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने १-० अशी आघाडी घेतली आहे.
वेस्ट इंडिजने बांगलादेशपुढे अखेरच्या दिवशी विजयासाठी २४५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण ३१ वर्षीय बेस्टने २४ धावांत ५ बळी घेत बांगलादेशचा दुसरा डाव १६७ धावांत गुंडाळला. बेस्टने शहरियार नफीज (२३), शाकिब अल हसन (२), मुशफिकर रहिम (१६) यांना झटपट बाद केले. त्यानंतर बांगलादेशकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या मोहम्मद महमदुल्लाहला (२९) तंबूची वाट दाखवली. दुसरी आणि अखेरची कसोटी २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
२००० मध्ये कसोटी क्रिकेटचा दर्जा लाभलेल्या बांगलादेशला ७४ कसोटी सामन्यांत हा ६४वा पराभव पदरी पडला. फलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे आणखी एका मानहानीकारक पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले. याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
त्याआधी, वेस्ट इंडिजचा दुसरा डाव सकाळी २७३ धावांवर आटोपला. पदार्पणवीर ऑफ-स्पिनर सोहाग गाझीने ७४ धावांत ६ बळी घेण्याची किमया साधली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा