IND vs WI : हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीला शुक्रवारपासून सुरूवात झाली. या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०८ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताने वर्चस्व राखले. भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी चांगली कामगिरी केली. कोहली वगळता तीनही खेळाडूंनी अर्धशतक ठोकले.

कोहलीला मात्र अर्धशतक साजरे करता आले नाही. पण शेवटच्या सत्रात रहाणे आणि पंत केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने त्रिशतकी मजल मारली. सध्या रहाणे ७५ धावांवर तर पंत ८५ धावांवर खेळत आहे. विंडिजकडून होल्डरने २ तर वॅरीकन आणि गॅब्रियल यांनी १-१ बळी टिपला.

चहापानाची वेळ होईपर्यंत भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावा केल्या. पहिल्या कसोटीत शतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉने या सामन्यातही आपली चमक दाखवली आणि केवळ ३९ चेंडूत अर्धशतक ठोकले. पण तो ७० धावांवर बाद झाला. पाठोपाठ पुजाराही तंबूत परतला. विराट आणि रहाणे जोडीने भारताचा डाव सावरला. पण विराटचे अर्धशतक हुकले. तो ४५ धावांवर बाद झाला.

त्याआधी विंडीजचा पहिला डाव ३११ धावांत संपला. पहिल्या दिवसअखेर विंडिजने ७ बाद २९५ धावा केल्या होत्या. त्या धावसंख्येवरुन पुढे खेळताना आज मात्र त्यांना फार धावा जमवता आल्या नाहीत. तिसऱ्या सत्रात काहीसे प्रभावहीन ठरलेल्या भारतीय गोलंदाजांनी आज दिवसाच्या सुरुवातीला शानदार कमबॅक केले आणि १६ धावांमध्ये विंडीजचे ३ गडी टिपले. एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या चेसने आपले शतक झळकावले. उमेश यादवने डावात ६ बळी टिपले. तर कुलदीप यादवने ३ आणि अश्विनने १ गडी बाद केला.

Story img Loader