IND vs WI 5th ODI : विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने विंडीजला ९ गडी राखून पराभूत केले आणि विंडीजविरुद्ध सलग आठवा मालिका विजय नोंदवला. विंडीजचा डाव अवघ्या १०४ धावांत गुंडल्यानंतर भारताने हे आव्हान १५ षटकाच्या आत पूर्ण केले. रवींद्र जाडेजाच्या अप्रतिम फिरकीच्या जोरावर भारताने विंडीजला १०४ धावांत रोखले होते. त्यानंतर रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिका ३-१ने खिशात घातली. रवींद्र जाडेजाला सामनावीर तर विराट कोहलीला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
CHAMPIONS #TeamIndia clinch the series 3-1 #INDvWI pic.twitter.com/1ZKZaUpRpF
— BCCI (@BCCI) November 1, 2018
नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण त्यांची सुरुवात खराब झाली. २ धावांत विंडीजने २ गडी माघारी परतले होते. त्यानंतर सम्युअल्सने काही काळ विंडीजच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण तो २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर रोवमन पॉवेलने ३९ चेंडूत १६ धावा करून माघारी परतला. कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक २५ धावा करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण तोदेखील लवकर बाद झाला. या तीन खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला २ आकडी धावसंख्या गाठता आली नाही. जाडेजाने ४, बुमराह व अहमदने २-२ तर कुलदीप आणि भुवनेश्वर कुमारने १-१ गडी बाद केला.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन हा ६ धावांवर तंबूत परतला. पण त्यानंतर रोहित शर्माने दमदार नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने ५६ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार लगावत ६२ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने २९ चेंडूत ३३ धावांची संयमी खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. विंडीजकडून थॉमसने एकमेव बळी टिपला.
रोहितचे अर्धशतक, भारताचा विजय दृष्टीपथात
भारताचा सलामीवीर शिखर धवन बाद झाला. थॉमसने त्याला ६ धावांवर त्रिफळाचित केले. शिखरने चौकार ठोकत चांगली सुरुवात केली होती. पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
केमार रोच माघारी, विंडीजचा नववा गडी बाद
भारताने विंडीजचा आठवा गडी बाद केला. कुलदीप यादवच्या चेंडूवर किमो पॉल झेलबाद झाला. त्याने १८ चेंडूत ५ धावा केल्या.
विंडीजच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न करणारा कर्णधार जेसन होल्डर २५ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने २ चौकार लगावले. खलील अहमद याने फेकलेल्या चेंडूवर केदार जाधवने त्याला झेलबाद केले.
अडखळत फलंदाजी सुरु असलेल्या विंडीजचा पाय आणखी खोलात गेला. विंडीजने फॅबियन अॅलनच्या रूपात सहावा गडी गमावला. त्याने ११ चेंडूत केवळ ४ धावा केल्या.
हेटमायर पाठोपाठ विंडीजने रोवमन पॉवेललाही गमावले. रोवमनने अतिशय शांत खेळी करत ३९ चेंडूत १६ धावा केल्या. पण दुसऱ्या बाजूने गडी बाद होण्यास सुरुवात झाल्यावर त्याने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण तो त्याच प्रयत्नात बाद झाला.
तडाखेबाज खेळी करणारा फलंदाज शिमरॉन हेटमायर बाद झाला. जाडेजाने त्याला पायचीत केले. पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते. पण DRS दरम्यान त्याला तिसऱ्या पंचांनी बाद ठरवले.
जाडेजाने सामन्यातील पहिला बळी टिपला. विंडीजचा अनुभवी फलंदाज मार्लन सॅम्युअल्स भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच जाडेजाने त्याचा अडसर दूर केला. त्याने ३८ चेंडूत २४ धावा केल्या.
विंडीजला बरेच 'होप' असलेला फलंदाज शाई होप शून्यावर बाद झाला. बुमराहच्या आत येणाऱ्या चेंडूला बॅट लागल्यामुळे चेंडू स्टंपवर आदळला आणि तो त्रिफळाचित झाला.
सामन्याच्या पहिल्याच षटकात भारताने विंडीजचा पहिला गडी माघारी धाडला. सलामीवीर कायरन पॉवेल भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. धोनीने यष्ट्यांच्या मागे त्याचा अप्रतिम झेल टिपला.
या एकदिवसीय मालिकेत प्रथमच विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. या आधी प्रत्येक सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली यानेच नाणेफेक जिंकली होती.