भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान विंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. पहिल्या दिवसअखेर विंडिजने ७ बाद २९५ धावा केल्या. नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात विंडीजने ३ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट आणि कायरन पॉवेल या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पण नंतर दोघेही झटपट बाद झाले.
दुसऱ्या सत्रात हेटमेयर १२ धावांवर आणि अम्बरीस १८ धावांवर झटपट बाद झाले. या दोघांना कुलदीप यादवने बाद केले. त्यानंतर डावरीचने काही काळ संघर्ष केला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तिसऱ्या सत्रात मात्र विंडीजच्या होल्डर – चेस जोडीने भारताच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. या दोघांनी शतकी (१०४) भागीदारी केली. अर्धशतकी खेळी केल्यानंतर कर्णधार जेसन होल्डर ५२ धावांवर बाद झाला. उमेश यादवने त्याला तंबूत धाडले. पण चेसने एका बाजूने किल्ला लढवला. सध्या चेस शतकापासून २ धावा दूर आहे.
दरम्यान पहिल्या दिवसाच्या खेळात 4 विक्रमांची नोंदही करण्यात आली.
294 – कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारा शार्दुल ठाकूर 294 वा खेळाडू ठरला. मात्र 10 चेंडू टाकल्यानंतर शार्दुलला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं.
100 – कुलदीप यादवच्या खात्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभराव्या बळीची नोंद झाली आहे. सुनील अँब्रिसला बाद करत कुलदीपने ही कामगिरी केली. आतापर्यंत कुलदीपने कसोटी क्रिकेटमध्ये 19, वन-डे मध्ये 58 तर टी-20 मध्ये 24 बळी घेतले आहेत.
अवश्य वाचा – IND vs WI : …आणि पाच वर्षांनी जुळून आला ‘हा’ हॅटट्रिकचा योगायोग
124 – सहाव्या विकेटसाठी रोस्टन चेस आणि शेन डॉव्रिच यांनी 124 चेंडूंचा सामना केला. मालिकेत वेस्ट इंडिजच्या जोडीने 100 पेक्षा जास्त चेंडूचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
98 – पहिल्या दिवसाच्या अखेरीस रोस्टन चेस 98 धावांवर नाबाद राहिला आहे. आपल्या 24 कसोटींच्या छोटेखानी कारकिर्दीत चेसने 90 ही धावसंख्या ओलांडण्याची दुसरी वेळ ठरली आहे.