रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात विंडीजवर ५ गडी राखून मात केली. विंडीजने दिलेलं माफक आव्हान पार करताना भारताची सुरुवात अडखळती झाली होती. मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी समर्थपणे फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान कालच्या सामन्यात तब्बल ९ विक्रमांची नोंद करण्यात आली.
० – पहिल्या १० टी-२० सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करताना रोहितने कर्णधार या नात्याने ९ सामने जिंकले आहेत. याआधी कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करणं जमलं नाहीये. शोएब मलिक, मायकेल क्लार्क, असगर अफगाण आणि सरफराज अहमद यांनी ८ सामने जिंकले आहेत.
१ – महेंद्रसिंह धोनीने भारताकडून टी-२० सामना न खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. याआधी भारतात खेळण्यात आलेल्या प्रत्येक टी-२० सामन्यात धोनीने भारतीय संघाचं प्रतिनिधीत्न केलं आहे.
२ – कृणाल आणि हार्दिक पांड्या ही भारताकडून खेळणारी दुसरी भावंडाची जोडी आहे. याआधी युसूफ आणि इरफान पठाण जोडीने भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे चारही खेळाडू मुळचे बडोद्याचे आहेत.
३ – कृणाल पांड्या, खलिल अहमद आणि विंडीजचा खेरी पेरी यांनी कालच्या सामन्यात ४ च्या सरासरीने गोलंदाजी केली. पहिलाच सामना खेळणाऱ्या ३ नवोदीत गोलंदाजांनी ४ च्या सरासरीने गोलंदाजी करण्याची टी-२० सामन्यातली ही पहिलीच वेळ ठरली.
३ – पदार्पणाच्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये २०० चा स्ट्राईक रेटने फलंदाजी आणि ४ च्या इकोनॉमीने गोलंदाजी करणारा कृणाल पांड्या तिसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानच्या अब्दुल रझाक आणि शाहिद आफ्रिकी यांनी अनुक्रमे २०१० आणि २०१५ साली अशी कामगिरी केली होती.
६ – २०१८ सालात आतापर्यंत ६ खेळाडूंनी भारताकडून टी-२० मध्ये पदार्पण केलं आहे.
७५ – कुलदीप यादवने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात मिळून १०० बळींचा टप्पा पार केला. ही कामगिरी करण्यासाठी कुलदीपने ७५ सामने घेतले. यासह कुलदीपने अमित मिश्राच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे.
१४२ – टी-२० क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिकने यष्टींमागे १४२ झेल टिपले आहेत. यासोबत दिनेशने कुमार संगकाराच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे, फक्त महेंद्रसिंह धोनीच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये १५१ झेल जमा आहेत.
१०९ – विंडीजची टी-२० क्रिकेटमधली भारताविरुद्धची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली.