चॅम्पियन्स करंडक स्पध्रेतील अपयश मागे सारून यजमान वेस्ट इंडिज आणि श्रीलंका शुक्रवारी तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेच्या सलामीच्या लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. चॅम्पियन्स करंडक जिंकणारा भारतीय संघ या स्पध्रेतील तिसरा संघ असेल.वेस्ट इंडिजचा संघ चॅम्पियन्स करंडकाच्या साखळीमध्येच गारद झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमामुळे विंडीजचा संघ पराभूत झाला होता. पावसाने आणि नशिबाने वेस्ट इंडिजला दगा दिला. तथापि, श्रीलंकेच्या संघाने भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शरणागती पत्करली होती. श्रीलंकेने बाद फेरीपर्यंतची मजल मारताना बलाढय़ ऑस्ट्रेलिया आणि उपविजेत्या इंग्लंडचा पराभव करण्याची किमया साधली होती. विंडीज आणि श्रीलंका हे दोन्ही संघ जवळपास तेच आहेत. फक्त यजमानांनी रामनरेश सरवान आणि जेसॉन होल्डर यांना वगळले आहे, तर लंकेला सलामीवीर तिलकरत्ने दिलशानला दुखापतीच्या कारणास्तव वगळावे लागले. चॅम्पियन्स करंडकात पाकिस्तानच्या फलंदाजाचा झेल घेतल्याचा चुकीचा दावा करणारा दिनेश रामदिन बंदीची शिक्षा भोगून पुन्हा वेस्ट इंडिज संघात परतला आहे.
श्रीलंकेचा संघ कॅरेबियन बेटांवर फार क्रिकेट खेळलेला नाही. याआधी २००७च्या विश्वचषक स्पध्रेसाठी ते वेस्ट इंडिज दौऱ्यावर आले होते. लंकेच्या फिरकी माऱ्याला या खेळपट्टीवर चांगली साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. अजंठा मेंडिसवर लंकेच्या फिरकीची मदार आहे. पण आता त्याच्यावर ट्वेन्टी-२० विशेषज्ञ असा शिक्का बसतो आहे.
चॅम्पियन्स करंडकाप्रमाणेच या तिरंगी क्रिकेट स्पध्रेवर वातावरणाचा प्रभाव पडू शकतो. वरुणराजाचा कृपाशीर्वाद लाभल्यास वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांत रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे. मेंडिस, सचित्र सेनानायके आणि रंगना हेराथ त्रिकुटावर श्रीलंकेच्या फिरकीची धुरा आहे, तर वेस्ट इंडिजची फलंदाजी धडाकेबाज ख्रिस गेलवर अवलंबून आहे. श्रीलंकेच्या फलंदाजीची सूत्रे कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने या अनुभवी खेळाडूंवर असतील. कॅरेबियन संघाचा कप्तान ड्वेन ब्राव्हो आपल्या अष्टपैलू खेळानिशी सामने जिंकून देण्यात वाकबदार आहे. याचप्रमाणे घरच्या मैदानावर तो अधिक आत्मविश्वासाने आणि उत्साहाने आपला खेळ दाखवू शकेल.
प्रतिस्पर्धी संघ
वेस्ट इंडिज : ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), टिनो बेस्ट, डॅरेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, ख्रिस्टोफर गेल, सुनील नरिन, किरॉन पोलार्ड, दिनेश रामदिन, रवी रामपॉल, केमार रोच, डॅरेन सॅमी, मार्लन सॅम्युअल्स आणि डेव्हॉन स्मिथ.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, उपुल थरंगा, कुमार संगकारा, लाहिरू थिरिमाने, महेला जयवर्धने, जीवन मेंडिस, अजंठा मेंडिस, दिनेश चंडिमल, नूवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, सचित्र सेनानायके, रंगना हेराथ, दिलहारा लोक्युहेटिगे आणि शमिंदा ईरंगा.