जेम्स अँडरसनची भेदक गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या बळावर इंग्लंडने वेस्ट इंडिजचा नऊ विकेट्स राखून पराभव केला आणि पाचव्या दिवशी दुसरी कसोटी खिशात घातली.
अँडरसनने ४३ धावांत ४ बळी घेतले, परंतु दुसऱ्या नव्या चेंडूचा प्रभावी वापर करताना त्याने ८ षटकांत १६ धावांत ३ बळी घेतले. याशिवाय दोन झेल आणि एका फलंदाजाला धावचीत करण्यात अँडरसनने मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे २ बाद २०२ असा दमदार प्रारंभ करणाऱ्या वेस्ट इंडिजचा दुसरा डाव ३०७ धावांत आटोपला.
इंग्लंडने मग एक फलंदाज गमावून १४३ धावांचे विजयी लक्ष्य आरामात पेलले. विंडीजचा वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रिएलने जोनाथन ट्रॉटला भोपळाही फोडू दिला नाही. परंतु कर्णधार अॅलिस्टर कुक (नाबाद ५९) आणि गॅरी बॅलन्स (नाबाद ८१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १४२ धावांची भागीदारी रचून विजय मिळवून दिला. दोनदा जिवदान मिळवणाऱ्या बॅलन्सने आपल्या १७व्या कसोटी डावात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला.
इंग्लंडच्या पहिल्या डावात नाबाद १८२ धावांची खेळी साकारणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आता १-० अशी आघाडी घेतली असून, तिसरी कसोटी शुक्रवारपासून बार्बाडोसच्या केन्सिंगटन ओव्हल येथे सुरू होईल.
अँडरसनची करामत
जेम्स अँडरसनची भेदक गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या बळावर इंग्लंडने वेस्ट इंडिजचा नऊ विकेट्स राखून पराभव केला आणि पाचव्या दिवशी दुसरी कसोटी खिशात घातली.
First published on: 27-04-2015 at 04:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies v england anderson inspires victory