वेस्ट इंडिज दौऱ्यावर बांगलादेशच्या संघाने अत्यंत निराशाजनक सुरुवात केली आहे. बुधवारी पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या ४३ धावात आटोपला. अँटिग्वातील सर व्हिवियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा कसोटी सामना सुरु आहे.

वेस्ट इंडिजच्या केमर रोचने भेदक मारा करत पाच षटकात अवघ्या आठ धावात देताना पाच गडी बाद केले. त्याला मीग्युल कमिन्सने योग्य साथ दिली. कमिन्सने अकरा धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा अचूक लाभ उठवत अवघ्या १८.४ षटकात बांगलादेशचा डाव संपवला. लिटॉन दास (२५) हा बांगलादेशचा एकमेव फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला. अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यांनी खेळपट्टीवर येऊन फक्त हजेरी लावण्याचे काम केले.

तमिम इक्बाल (४), मोमिनुल (१) मुशाफिकूर रहीम (०), शाकीहब अल हसन (०) आणि महमदुल्ला (०) यांना रोचने बाद केले. त्यापैकी तिघांना रोचने भोपळाही फोडू दिला नाही. अलीकडच्या काळातील वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचे हे सर्वोत्तम प्रदर्शन केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात नीचांकी धावसंख्या नोंदवणारा बांगलादेश आशिया खंडातील दुसरा संघ ठरला आहे. असा लाजिरवाणा रेकॉर्ड भारताच्या नावावर आहे. १९७४ साली इंग्लंड विरुद्ध भारताचा पहिला डाव ४२ धावात आटोपला होता.

Story img Loader