Devon Thomas Banned For 5 Years : क्रिकेट विश्व सध्या आयपीएल २०२४ च्या उत्साहात बुडाले आहे. पण या सगळ्या जल्लोषात वेस्ट इंडिजच्या एका यष्टीरक्षक खेळाडूवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने ३४ वर्षीय कॅरेबियन क्रिकेटर डेव्हन थॉमसवर ५ वर्षांसाठी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्यावर बंदी घातली आहे. डेव्हॉन थॉमस हा यष्टीरक्षक तसेच अर्धवेळ गोलंदाज असलेल्या काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही विकेट्स घेतल्या आहेत.
डेव्हन थॉमसने कबूल केले आहे की त्याने श्रीलंका क्रिकेट, अमिराती क्रिकेट बोर्ड आणि कॅरेबियन प्रीमियर लीगच्या ७ अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केले आहे. यामुळे आयसीसीने त्याच्यावर कडक कारवाई करत त्याला ५ वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने गेल्या वर्षी मे महिन्यात डेव्हन थॉमसला ७ आरोपांवरून निलंबित केले होते, मात्र आता त्याच्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोपही करण्यात आला होता आणि त्याला स्वतःचे स्पष्टीकरण देण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
आयसीसीच्या इंटिग्रिटी युनिटचे महाव्यवस्थापक ॲलेक्स हेल्स यांनी एक निवेदन जारी करताना सांगितले की, “आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत क्रिकेट आणि फ्रँचायझी क्रिकेट व्यावसायिकपणे खेळलेल्या डेव्हॉन थॉमसने भ्रष्टाचारविरोधी अनेक सत्रांमध्ये भाग घेतला होता. त्याला याची जाणीव होती की, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि फ्रँचायझी क्रिकेट’ या संस्थेच्या अंतर्गत भ्रष्टाचार संहिता त्याच्या जबाबदाऱ्या काय होत्या, पण तो त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे ही बंदी योग्यरित्या लागू करण्यात आली आहे आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या इतर खेळाडूंनाही संदेश देतो की असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
हेही वाचा – T20 WC 2024 : रिंकूला संघातून वगळणे सर्वात कठीण निर्णय, केएल राहुलबद्दल काय म्हणाले अजित आगरकर?
डेव्हन थॉमसची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
डेव्हन थॉमस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजसाठी फक्त sK कसोटी सामना खेळू शकला, ज्यामध्ये त्याने ३१ धावा केल्या आणि २ बळीही घेतले आहेत. वेस्ट इंडिजसाठी २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये २३८ धावा करण्यासोबतच त्याने २ बळीही घेतले. त्याचबरोबर १२ टी-२० सामन्यांमध्ये थॉमसला केवळ ५१ धावा करता आल्या. २०२२ मध्ये तो शेवटचा वेस्ट इंडिजकडून खेळताना दिसला होता.