ओम साईश्वर क्रीडा मंडळ, लालबाग यांच्यातर्फे मुंबई खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पध्रेतील व्यावसायिक गटाच्या रंगतदार अंतिम फेरीत पश्चिम रेल्वेने मध्य रेल्वेचा १०-९ असा एक गुण व एक मिनिट राखून पराभव केला. मध्यंतराला पश्चिम रेल्वेकडे अवघ्या एका गुणाची आघाडी होती. पश्चिम रेल्वेकडून तक्षक गौंडाजेने २:१० मि., २:०० मि. संरक्षण केले. मजर जमादारने आक्रमणात तीन गडी टिपले तर अमोल जाधवने २:१० मि., २:०० मि. संरक्षण केले, तर मध्य रेल्वेतर्फे खेळताना दिपेश मोरेने २:४० मि., २:१० मि. संरक्षण करत आक्रमणात दोन गडी टिपले. याशिवाय विलास कारंडे आणि अनुप परब यांनी चांगला खेळ केला.
स्थानिक पुरुषांच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरने (माहीम) प्रबोधन क्रीडा मंडळाचा (गोरेगाव) अलाहिदा डावात २०-१८ असा पराभव केला. मध्यंतराला अवघ्या एका गुणाने पिछाडीवर असलेल्या ओम समर्थने दुसऱ्या सत्रात सुंदर संरक्षण करत सामना बरोबरीत आणला आणि मग अलाहिदा डावात चांगल्या खेळाच्या जोरावर बाजी मारली. ओम समर्थकडून तब्बल नऊ गडी सूर मारून टिपण्यात आले तर प्रबोधननेही आठ गडी सूर मारत टिपले. सामना रंगतदार तर झालाच, पण त्यातील बाचाबाचीमुळे ओम समर्थच्या प्रशिक्षकांना तांबडे कार्ड पंचप्रमुख कांती सरवय्या यांनी दाखवले. ओम समर्थतर्फे विलास कारंडेने २:१० मि., ३:५० मि., १:३० मि. संरक्षणाची वेळ नोंदवत तीन गडी बाद केले, तर प्रयाग कनगुटकरने २:५० मि., १:२० मि., २:५० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, तर स्वप्निल कोतवाल आणि प्रफुल्ल तांबे यांनी प्रत्येकी तीन गडी मिळवून त्यांना चांगली साथ दिली. दुसऱ्या लढतीत दादरच्या अमर िहद मंडळाने परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्रावर अलाहिदा डावात १९-१८ असा खळबळजनक विजय नोंदवला. अमर िहदकडून प्रसाद राडियेने २:५० मि., २:३० मि., १:२० मि. संरक्षण करून पाच गडी टिपले. अभिषेक कागडा आणि किरण कर्णावरने त्याला चांगली साथ दिली. विद्यार्थीकडून विश्वजित कांबळे, राहुल उईके आणि यश चव्हाण यांनी अप्रतिम कामगिरी केली.