What Happens if India Loses First Test Against New Zealand: भारत आणि न्यूझीलंडमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रोमांचक वळणावर येऊन ठेपला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ४६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. भारताच्या टॉप ऑर्डरने विस्फोटक फलंदाजी करत दुसऱ्या डावात सर्वबाद ४६२ धावा केल्या. यासह भारताने न्यूझीलंडला विजयासाठी अवघ्या १०७ धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवशी भारताने ४ चेंडू टाकले पण पावसाने काळोख केल्याने खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आणि त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे खेळ रद्द करण्यात आला. न्यूझीलंडकडे फलंदाजीसाठी संपूर्ण एक दिवस आहे. त्यामुळे भारतीय संघाने जर हा सामना गमावला तर काय होईल, कसं असेल समीकरण, जाणून घेऊया.

भारत-न्यूझीलंड कसोटीतील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. पहिल्या दिवशी नाणेफेकही झाली नाही. दुसऱ्या दिवशी झालेली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ ४६ धावांवर सर्वबाद झाला होता. घरच्या मैदानावर कसोटीत नोंदवलेली ही भारताची सर्वात कमी धावसंख्या होती. यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंडने रचिन रवींद्रचे शतक आणि डेव्हॉन कॉन्वेच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर ४०२ धावा केल्या. पण भारतीय संघानेही हार मानली नाही आणि दुसऱ्या डावात विस्फोटक फलंदाजी केली.

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

भारताकडून यशस्वी जैस्वालने ३५ धावा, रोहित शर्माने ५२ धावा, विराट कोहलीने ७० धावा करत भारताच्या धावांमध्ये मोठी भर घातली. पण सर्फराझ खानने पहिले शतक झळकावताना १५० धावा करत भारताचा डाव उचलून धरला. तर ऋषभ पंतनेही त्याला चांगली साथ दिली. पण दुर्देवाने पंत ९९ धावा करत बाद झाल्याने त्याचे शतक हुकले. यानंतर इतर फलंदाजांना भारताचा डाव पुढे नेता आला नाही आणि नवीन चेंडू घेतल्यानंतर भारताने झटपट विकेट गमावल्या.

हेही वाचा – IND vs PAK: भारत-पाकिस्तानमध्ये आज होणार हायव्होल्टेज लढत, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार लाइव्ह?

IND vs NZ: WTC फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागणार?

भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. संघाला उर्वरित ८ सामन्यांमध्ये एकूण ५ सामने जिंकावे लागणार आहेत. रोहित शर्मा आणि कंपनीला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण यादरम्यान पहिला कसोटी सामना भारत जिंकेल का असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

न्यूझीलंड संघाने पहिला कसोटी सामना जिंकला तर टीम इंडियाला पुढील दोन सामने जिंकावे लागतील कारण, भारतासाठी ऑस्ट्रेलिया दौरा असणार नाही. भारताला बांगलादेशविरुद्ध सहज विजय मिळाला पण न्यूझीलंड संघ मात्र भारताला कडवी टक्कर देत आहे. अशातच जर भारताने पहिली कसोटी गमावली तर यानंतर आणखी ७ कसोटी सामने शिल्लक असतील. ज्यामध्ये भारताला कोणत्याही परिस्थितीत ५ सामने जिंकावे लागतील. पण या ५ कसोटींमध्ये एकही पराभव आणि एकही सामना ड्रॉ झाला तर टीम इंडियाला मोठी किंमत मोजावी लागू शकते.

हेही वाचा – IND vs NZ: “जेव्हा भारताला सर्वात जास्त…,” सचिन तेंडुलकरची सर्फराझ खानसाठी खास पोस्ट, पहिल्या शतकाबद्दल पाहा काय म्हणाला?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत, भारतीय संघाने ११ सामने खेळले आहेत, ज्यात संघाने ८ सामने जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. संघाचे एकूण ९८ गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी ७४.२४ आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांनी एकूण १२ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत आणि ३ सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या गुणांची टक्केवारी ६२.५० आहे. न्यूझीलंडनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळायची आहे.