पहिल्या कसोटीत हातात आलेल्या विजयावर पाणी सोडावं लागल्यानंतर भारतीय संघाची लॉर्ड्स कसोटीतही बिकट अवस्था झाली. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर इंग्लिश गोलंदाजांच्या माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव अवघ्या १०७ धावांवर आटोपला. दुसऱ्या कसोटीसाठी सलामीवीर शिखर धवनला संघातून वगळण्यात आलं, त्याच्याजागेवर लोकेश राहुलने भारतीय डावाची सुरुवात केली. मात्र राहुल आणि मुरली विजय या दोन्ही फलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाहीये. भारतीय संघात प्रत्येक वेळी शिखर धवनलाच बाहेरचा रस्ता दाखवला जातो, असं म्हणत गावसकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते मुंबई मिरर या वृत्तपत्राशी बोलत होते.

“संघातील प्रत्येक खेळाडूला दुसरी संधी मिळते. त्यामुळे शिखर धवनलाही दुसरी संधी मिळायलाच हवी. पहिल्या कसोटी सामन्यातील कामगिरी पहायला गेली, तर शिखरने लोकेश राहुल आणि मुरली विजयपेक्षा जास्त चांगला खेळ करुन धावा काढल्या आहेत. तरीही दुसऱ्या कसोटीसाठी शिखरला विश्रांती देण्यात आली, मग संघात खेळाडूंच्या निवडीचे निकष नेमके आहेत तरी काय?” गावसकरांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

प्रत्येक कसोटीत खेळपट्टी पाहून संघाची निवड होणं गरजेचं आहे. शिखर हा डावखुरा फलंदाज असल्यामुळे भारताच्या फलंदाजीत एक वैविध्य येऊ शकलं असतं. मात्र सध्याच्या संघात कुलदीप यादव हा एकमेव डावखुरा फलंदाज आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये खेळताना तुमच्या संघात सर्वोत्तम सहा फलंदाज असणं गरजेचं असल्याचंही गावसकर म्हणाले. समोरचा संघ आपल्यासाठी नेमकी काय रणनिती आखत आहे याचा विचार करणंही गरजेचं आहे, दुसऱ्या कसोटीत याच गोष्टीत भारतीय संघ कमी पडला असल्याचं गावसकर म्हणाले.

Story img Loader