Five Reasons Of Team India Defeat In WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडच्या ओव्हल मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना रंगला. या सामन्यात टीम इंडियाचा २०९ धावांनी पराभव झाला. टीम इंडियाला याआधीही डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, टीम इंडिया यावेळी किताब जिंकेल, अशी अशा चाहत्यांना होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला हा सामना जिंकण्यासाठी २८० धावांची आवश्यकता होती आणि संघाच्या हातात सात विकेट्स होत्या. परंतु, टीम इंडियाने एका पाठोपाठ एक विकेट्स गमावल्या आणि पहिल्याच सत्रात संघ २३४ धावांवर गारद झाला. अशातच टीम इंडियाने कोणत्या चुका केल्या? असा प्रश्न उपस्थित झाला असून आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.
खेळपट्टीचा अभ्यास करण्यात चूक झाली
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहितचा हा निर्णय चुकीचा ठरला. कारण ऊन पडल्याने खेळपट्टी पहिल्याच दिवसापासून फलंदाजीसाठी अनुकूल होती. रोहित आणि टीम मॅनेजमेंटकडून खेळपट्टीचं योग्य निरिक्षण करण्यात चूक झाली. कसोटी क्रिकेटमध्यो चौथ्या इनिंगमध्ये फलंदाजी करणं कठीण असतं. परंतु, रोहितने गोलंदाजी घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला. भारताचा इंग्लंडमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रेकॉर्डली खराब आहे. जेव्हा टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, अशा सामन्यांमध्ये संघाला ३८ सामन्यांपैकी २० सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारताचे दिग्गज फलंदाज झाले ढेर
ओव्हलच्या मैदानात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसले. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाली. काही खेळाडू खराब शॉट खेळून माघारी परतले. अजिंक्य रहाणेला सोडलं तर इतर कोणत्याही फलंदाजाने कमाल केली नाही. त्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली. रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये ८९ धावा केल्या. तर दुसरीकडे शार्दूल ठाकूरने ५१ धावा आणि जडेजाने ४८ धावांची खेळी केली.
रविचंद्रन आश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय
रविचंद्रन आश्विन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दरम्यान सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज राहिला आहे. परंतु, टीम मॅनेजमेंटने या चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्यात आश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. कर्णधार आणि प्रशिक्षकाचा हा निर्णय चाहत्यांसह दिग्गजांना योग्य वाटला नाही. आश्विन डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्यातही माहीर आहे. परंतु, त्याला खेळापासून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ट्रेविस हेडचा झेल पडला महागात
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतक ठोकलं. ट्रेविस हेड पहिल्या इनिंगमध्ये शतकी खेळी न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला असता. परंतु, रहाणेनं त्याचा झेल ड्रॉप केला आणि टीम इंडियासाठी हे खूप महागात पडलं. कारण त्याने १६३ धावांची शतकी खेळी केली आणि पहिल्याच दिवशी टीम इंडियाला बॅकफूटला टाकलं. ट्रेविस हेडने या सामन्यात वेगानं धावा कुटल्या. पहिल्याच इनिंगमध्ये त्याने १७४ चेंडूत १६३ धावा कुटल्या.