What is the meaning of the Olympic rings?: ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक आहे. १८९६ मध्ये प्रथम ऑलिम्पिक गेम्स खेळले गेले होत. तेव्हापासून दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेचे पदक जिंकायचे असते. प्रत्येक देशाच्या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये आपली छाप पाडायची असते आणि त्यासाठी खेळाडू वर्षानुवर्षे तयारी करत असतात. आपण कायमचं Olympicचा लोगो पाहत आलो आहोत, ज्यामध्ये पाच वेगवेगळ्या रंगाची पाच वर्तुळ किंवा रिंग एकमेकांत गुंतलेली दिसत आहेत. पण या लोगोमागील नेमका अर्थ काय आहे, याचा आढावा घेऊया.
Olympicचा लोगो कोणी बनवला?
ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या पाच रिंग असतात, ज्या एकमेकांना जोडलेल्या असतात. या रिंग निळ्या, पिवळ्या, काळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या आहेत आणि या सर्व रिंग समान आकाराच्या आहेत. निळ्या, काळ्या आणि लाल रंगाच्या रिंगवर पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या उर्वरित दोन रिंग डिझाइन केलेल्या आहेत. १९१३ मध्ये पियरे डी कौबर्टिन यांनी या लोगोची रचना केली होती. यानंतर, १९२० च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये ऑलिम्पिक रिंग्जने पदार्पण केले.
ऑलिम्पिक चार्टरच्या नियम८ नुसार, ऑलिम्पिक लोगो ऑलिम्पिक चळवळीचा संदर्भ देते. जे ऑलिम्पिकच्या सार्वत्रिकतेचे प्रतीक आहे. पाच रिंग खेळाडूंच्या सहभागाचे प्रतीक आहेत. पियरे डी कौबर्टिनने पांढऱ्या ध्वजासह पाच रंगीत रिंग एकत्र करून सर्व देशांचे ध्वज म्हणून ऑलिंपिक लोगोची रचना केली होत. पण नंतर याचा एक नवीन अर्थ लावण्यात आला.
ऑलिम्पिक रिंग पाच खंडांचे प्रतीक आहे. यामध्ये आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोपचा समावेश आहे. परंतु कोणता रंग कोणत्या खंडाचे प्रतिनिधित्व करतो हे स्पष्ट नाही. जरी एखादा विशिष्ट रंग कोणत्याही खंडाशी संबंधित नसला तरी, १९५१ पूर्वी ऑलिम्पिकच्या अधिकृत पुस्तिकेत असे नमूद केले होते की निळा रंग युरोप, पिवळा आशिया, आफ्रिकेसाठी काळा, ऑस्ट्रेलिया-ओशनियासाठी हिरवा आणि अमेरिकेसाठी लाल रंग दर्शवितो.
Olympics 2024 येत्या २६ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे आणि यावेळी दहा हजाराहून अधिक खेळाडू ऑलिम्पिकच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी भारताच्या क्रीडा मंत्रालयाने पॅरिस ऑलिम्पिकसाठी एकूण ११७ खेळाडूंना मान्यता दिली आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती आणि सुवर्ण पदकासह एकूण ७ पदके जिंकली होती. यावेळी भारताच्या पदकांची संख्या दुहेरी आकडीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.